जयपूर : सिक्सर किंग युवराज सिंहच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई इंडियन्सने युवीला बेस प्राईस एक कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. लिलावाच्या पहिल्या टप्प्यात युवराजवर कुणीही बोली लावली नाही आणि तो अनसोल्ड राहिला. पण मुंबई इंडियन्सने त्याला नवसंजीवनी दिली आहे. त्यामुळे युवी आता मुंबईकडून खेळताना दिसेल.
जयपूरमध्ये आगामी आयपीएल मोसमासाठी लिलाव प्रक्रिया सुरु आहे. वरुण चक्रवर्तीने या लिलावात सर्वांना हैराण केलंय. देशात या खेळाडूचं नावही अजून माहित नसताना त्याच्यावर किंग्ज इलेव्हन पंजाबने 8 कोटी 40 लाख रुपये खर्च केले आहेत. राजस्थान रॉयल्सकडून जयदेव उनाडकटलाही एवढीच रक्कम देण्यात आली आहे.
वरुण चक्रवर्ती जयपूरमध्ये सुरु असलेल्या लिलावातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. इंग्लंडचा सॅम करन हा सर्वात महागडा दुसरा खेळाडू ठरलाय. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्यावर 7 कोटी 20 लाखांची बोली लावत खरेदी केलं. गेल्या वर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळलेला मोहम्मद शमी यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसेल. पंजाबने त्याच्यावर 4.8 कोटींची बोली लावली.
गतविजेता चेन्नई सुपर किंग्जने मोहित शर्माला पाच कोटींमध्ये खरेदी केलंय. तर तीन वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सने दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगाला पुन्हा खरेदी केलंय. मलिंगाला त्याची बेस प्राईस दोन कोटींमध्ये खरेदी करण्यात आलं. गेल्या वर्षी अनसोल्ड राहिलेला इशांत शर्मा यावेळी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. त्याला दिल्लीने 1.1 कोटींमध्ये खरेदी केलं.