नाव – युवराज सिंह, वय 37 वर्ष, 6 चेंडूत 6 सिक्स, युवीची संपूर्ण कारकीर्द

| Updated on: Jun 10, 2019 | 4:06 PM

युवराज योगराज सिंह हा क्रिकेटविश्वातला तारा आता निवृत्त झाला आहे. युवराज सिंहने भारतीय क्रिकेटला भरभरुन दिलं. युवराजने आपल्या अष्टपैलू कामगिरीने जगाचं लक्ष वेधून घेतलं. 

नाव - युवराज सिंह, वय 37 वर्ष, 6 चेंडूत 6 सिक्स, युवीची संपूर्ण कारकीर्द
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन युवराज सिंहने क्रिकेटला अलविदा केला. निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी युवीच्या आयुष्यावरील माहितीपट दाखवण्यात आला. यादरम्यान युवराज खूपच भावूक झाला.

युवराज सिंहचं संपूर्ण करिअर

  • नाव – युवराज सिंह
  • जन्म – 12 डिसेंबर 1981
  • जन्मस्थळ – चंदीगड
  • वय – 37 वर्ष
  • फलंदाजी – डावखुरा
  • मॅन ऑफ द मॅच – वन डेमध्ये 27 वेळा, विश्वचषक 4, टी 20 – 7 आणि आयपीएल -5

करिअर –

  • वन डे – 2000 ते 2017
  • कसोटी – 2003 ते 2012
  • वर्ल्डकप – 2003 ते 2011
  • टी 20 – 2007 ते 2017
  • आयपीएल – 2008 -2019

युवराज योगराज सिंह हा क्रिकेटविश्वातला तारा आता निवृत्त झाला आहे. युवराज सिंहने भारतीय क्रिकेटला भरभरुन दिलं. युवराजने आपल्या अष्टपैलू कामगिरीने जगाचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय संघाने वर्ष 2000 मध्ये अंडर 19 विश्वचषक जिंकल्यानंतर युवराज सिंह चर्चेत आला. बघता बघता युवीने भारतीय संघात स्थान मिळवलं. आयसीसीच्या नॉकआऊट ट्रॉफीसाठी केनिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात युवराज सिंहची निवड झाली होती.

युवराज सिंहने करिअरमधील दुसऱ्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ग्लेन मॅग्रा, ब्रेट ली सारख्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्या सामन्यात युवीने 84 धावा ठोकल्या.

नॅटवेस्टमध्ये धडाकेबाज कामगिरी

2002 मध्ये नॅटवेस्ट सीरिज आजही सर्वांच्या लक्षात आहे. या मालिकेतील अंतिम सामन्यात युवराज सिंहने मोहम्मद कैफच्या साथीने जबरदस्त फलंदाजी केली होती. याच सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्याने तत्कालिन कर्णधार सौरव गांगुलीने शर्ट काढून फिरवला होता.

2007 मध्ये टी 20 विश्वचषकात युवराजने क्रिकेट विश्वात आपली छाप सोडली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते.

2011 मध्ये भारताने जिंकलेल्या वन डे विश्वचषकात युवराज सिंहने दमदार कामगिरी केली होती. युवराज या विश्वचषकात मालिकावीर ठरला होता.

कॅन्सरचं निदान

युवराज सिंहच्या दमदार कामगिरीनंतर भारताने विश्वविजयाला गवसणी घातली. मात्र त्यानंतर काहीच दिवसात युवराज सिंहला कॅन्सर असल्याचं निदान झालं. कॅन्सर असूनही युवीने विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी केली.

कॅन्सरमुळे युवराज अनेक महिने क्रिकेटपासून दूर राहिला. 2012 मध्ये वर्ल्ड टी 20 मध्ये युवराजने पुनरागमन केलं. मात्र युवराजची कामगिरी ढासळत गेली. 2014 मध्ये टी 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात युवराजने अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे तो टीकेचा धनी बनला. परिणामी युवराजला संघातून वगळण्यात आलं.

युवराज भारताकडून अखेरचा वन डे सामना 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने 55 चेंडूत 39 धावा केल्या होत्या.

युवराजची कारकीर्द

भारताने जिंकलेल्या टी 20 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युवराज सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॅन्सरचं निदान होऊनही युवराज सिंह ढाण्या वाघासारखा लढला होता.

युवराज सिंहने भारताकडून 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे.

शिवाय युवराजने 40 कसोटी सामन्यात 1900 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

तर टी 20 स्पेशालिस्ट युवराजने 58 सामन्यात 8 अर्धशतकांसह 1177 धावा केल्या आहेत.