स्मिथबाबत अख्तरचं ट्वीट, युवराजच्या भन्नाट उत्तराने ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ गारद

| Updated on: Aug 20, 2019 | 10:14 AM

स्मिथला दुखापत झाली असतानाच आर्चरने त्याच्या जवळ जाण्याचंही सौजन्य न दाखवल्याने शोएब अख्तरने ट्विटरवरुन चीड व्यक्त केली. त्यावर युवराजने दिलेलं उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे

स्मिथबाबत अख्तरचं ट्वीट, युवराजच्या भन्नाट उत्तराने रावळपिंडी एक्स्प्रेस गारद
Follow us on

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात तुफान फटेकबाजीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे क्रिकेटपटू सेकंड इनिंगमध्ये सोशल मीडियावरील ‘बोलंदाजी’ने भल्याभल्यांना गारद करताना दिसतात. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, गौतम गंभीर ही त्यातलीच काही उदाहरणं. इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या (Jofra Archer) फटक्याने घायाळ झालेला ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथबाबत  (Steve Smith) पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) ट्वीट केलं. मात्र भाव खाऊन गेलं, ते त्यावर युवराज सिंहने (Yuvraj Singh) दिलेलं उत्तर.

अॅशेस मालिकेत चौथ्या दिवशीच्या खेळात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा उसळता चेंडू स्टीव्ह स्मिथच्या मानेला लागल्याने फिलिप ह्युजेसच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. या बाउन्सरने स्मिथ जागेवरच कोसळला होता. स्मिथने मान झाकले जाणारं हेल्मेट घातलं नव्हतं. स्मिथवर काही वेळ मैदानातच उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. स्मिथला दुखापत झाली असतानाच आर्चरने त्याच्या जवळ जाण्याचंही सौजन्य न दाखवल्याने ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शोएब अख्तरने ट्विटरवरुन चीड व्यक्त केली.

‘बाऊन्सर्स तर खेळाचा भाग आहेत. पण जेव्हा एखाद्या गोलंदाजामुळे फलंदाजाच्या डोक्याला दुखापत होते, आणि तो पडतो. तेव्हा जाऊन त्याला काही लागलं आहे का, हे पाहणं गोलंदाजाचं कर्तव्य आहे. स्मिथ वेदनेने विव्हळत असताना निघून जाणं आर्चरला शोभत नाही. असं काही घडल्यास फलंदाजाकडे धाव घेणारा मी पहिला असायचो.’ अशा आशयाचं ट्वीट अख्तरने केलं आहे.

शोएब अख्तरच्या ट्वीटला टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराजने भन्नाट उत्तर दिलं आहे. ‘हो, तू करायचास. पण तुझ्या मनात असायचं, तू बरा असशील अशी आशा आहे मित्रा, कारण आणखी काही (बाऊन्सर्स) येत आहेत.’

अख्तर आणि युवराज यांच्यात ट्विटरवर नेहमीच जुगलबंदी रंगत असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून युवराजने 10 जून रोजी निवृत्ती घेतली होती. जेव्हा अख्तर गोलंदाजी करायचा, तेव्हा मी प्रचंड घाबरायचो, अशी कबुली युवीने निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी ट्विटरवरुन दिली होती. अख्तरनेही युवराजला निरोप देताना ट्विटरवरुन व्हिडीओ शेअर केला होता.