मुंबई : जगभरात डेटिंग अॅप युझर्स मोठ्या प्रमाणात आहेत. डेटिंग अॅप म्हणजे टिंडर आणि हॅपेन सारखे अॅप्लिकेशन. या अॅप्सचा वापर जोडीदार शोधण्यासाठी तसेच मॅच बनवण्यासाठी होतो. या डेटिंग अॅपमध्ये युझरला त्याची खाजगी माहिती द्यावी लागते. यामध्ये युझरचं वय, जन्म तारीख, आवड यांसारखी अनेक खाजगी माहिती असते. अशात युझरचा पर्सनल डेटा सुरक्षित असणे आवश्यक असते. मात्र, चीनमध्ये या डेटिंग अॅपसंबंधी एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. या डेटिंग अॅपमधील युझर्सची खाजगी माहिती लीक झाली आहे. यामुळे आता डेटिंग अॅपच्या प्रायव्हसीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
चीनच्या डेटाबेसमध्ये पासवर्ड सुरक्षा नसल्याने वेगवेगळ्या अॅप्सच्या माध्यमातून जवळपास 4 कोटी 25 लाख युझर्सचा डेटा लीक झाला आहे, अशी माहिती एका सुरक्षा विश्लेषकांनी दिली.
जेरमिया फाऊलरने 25 मे रोजी एका अनप्रोटेक्टेड इलास्टिक डेटाबेसचा शोध लावला, जो सरळ-सरळ डेटिंग अॅपशी जोडलेला होता. “आईपी अॅड्रेस अमेरिकेच्या सर्व्हरवर आधारित आहेत. यातील युझर्स जास्तकरुन अमेरिकेचे असल्याचं जाणवतं. पण डाटाबेसच्या आत चीनी भाषेतही लिहिलेलं आढळलं”, असं फाउलरने सिक्योरिटी डिस्कव्हरीमध्ये सांगितलं. सिक्योरिटी अॅनालिस्टच्या मते या डेटाबेसचा मालक चीनी होता.
लीक झालेल्या या डाटाबेसमध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक व्यवहारासंबंधी माहिती नव्हती. मात्र, यामुळे डेटिंग अॅप वापरणाऱ्या 4 कोटी 25 लाख लोकांची खाजगी माहिती लीक झाली आहे. यावरुन ऑनलाईन व्यवहार किंवा कुठल्याही अॅप्लिकेशमध्ये आपली खाजगी माहिती देणे हे किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. अशा प्रकारे खाजगी माहिती लीक होण्याचं हे काही पहिलं प्रकरण नाही. यापूर्वीही अनेक ऑनलाईन साईट्सवरुन लोकांची खाजगी माहिती लीक झालेली आहे. यामधून फेसबुकही सुटलेलं नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या साईट्सवर आपली खाजगी माहिती देताना जरा सावधानता बाळगावी.