भारतात 5G Network साठी टेस्टिंग, स्मार्टफोन युजर्सना लवकरच मिळणार सर्व्हिस

| Updated on: May 04, 2021 | 9:07 PM

दूरसंचार विभाग आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना भारतात 5G नेटवर्कच्या चाचण्यांसाठी (5G Trials) परवानगी दिली आहे.

भारतात 5G Network साठी टेस्टिंग, स्मार्टफोन युजर्सना लवकरच मिळणार सर्व्हिस
5g Trials Started In India
Follow us on

नवी दिल्ली : दूरसंचार विभाग (Department of Telecommunications) आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना 5G चाचण्यांसाठी (5G Trials) परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळालेल्या ऑपरेटर्समध्ये भारती एअरटेल, रिलायन्स, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एमटीएनएलचा समावेश आहे. या दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स) ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आणि तंत्रज्ञान प्रदात्यांसह (टेक्नोलॉजी प्रोव्हायडर्स) म्हणजेच एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि C-DOT बरोबर भागीदारी केली आहे. त्याच वेळी, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड त्यांनी स्वत: विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे ट्रायल्सची चाचणी करणार आहे. (5G Trials Set To Begin In India, Smartphone Users Could Be Using 5G Very Soon)

दूरसंचार विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांनी चिनी विक्रेत्यांना (Chinese Vendors) या ट्रायल्सपासून दूर ठेवले आहे, म्हणजेच हुवावे या 5 जी ट्रायल्समध्ये भाग घेऊ शकणार नाही. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा संपूर्ण देशात 5G ची मागणी वाढू लागली आहे. प्रत्येक कंपनी गेल्या काही काळापासून 5 जी बद्दल बोलत आहे पण प्रत्येकजण सरकारच्या आदेशाची वाट पाहत होता.

Jio चं स्वतःचं नेटवर्क

रिलायन्स जिओने यापूर्वीच पुष्टी केली आहे की, ते एक स्वदेशी 5 जी नेटवर्क विकसित करणारर आहेत. जिओचे 5 जी नेटवर्क भारतातच विकसित केले जाईल आणि त्याचे पूर्ण लक्ष मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारतावर असेल. त्याच वेळी, एअरटेलने हैदराबादमधील व्यावसायिक नेटवर्कवरील यशस्वी 5G चाचणीची पुष्टी केली होती. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे नेटवर्क 5G तयार आहे आणि आता ते केवळ परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

ट्रायल्ससाठी 6 महिने

सध्या या ट्रायल्सचा कालावधी 6 महिन्यांचा आहे. यात उपकरणे खरेदी व स्थापनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. परवानगीमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की, प्रत्येक टेलिकॉम कंपनीला शहरी सेटिंग्ज व्यतिरिक्त ग्रामीण आणि निम-शहरी सेटिंग्जमध्ये ट्रायल्स घ्याव्या लागतील. जेणेकरून देशभरातील 5 जी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल आणि हे नेटवर्क केवळ शहरी भागातच मर्यादित न राहता निम-शहरी आणि ग्रामीण भागातही पोहोचेल.

वेगवेगळ्या बँडमध्ये टेस्टिंग

टेस्टिंग स्पेक्ट्रम वेगवेगळ्या बँडमध्ये ऑफर केली जाते, ज्यामध्ये मिड-बँड (3.2 गीगाहर्ट्ज ते 3.67 गीगाहर्ट्ज), मिलीमीटर वेव्ह बँड (24.25 गीगाहर्ट्ज ते 28.5 गीगाहर्ट्ज) आणि सब-गीगाहर्ट्ज बँड (700 गीगाहर्ट्झ) आहेत. टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या 5 जी ट्रायल्स घेण्यासाठी सध्याचे स्पेक्ट्रम (800 मेगाहर्ट्ज, 900 मेगाहर्ट्ज, 1800 मेगाहर्ट्ज आणि 2500 मेगाहर्ट्ज) वापरण्याची परवानगी दिली आहे.

संबंधित बातम्या

तीन महिन्यात भारतात 5G नेटवर्क सुरु होणार? 10 लाख नोकऱ्या मिळणार

काय आहे 5G? तुम्हाला किती स्पीड मिळेल?

(5G Trials Set To Begin In India, Smartphone Users Could Be Using 5G Very Soon)