नवी दिल्ली | 28 जुलै 2023 : तंत्रज्ञान प्रत्येक दिवशी कात टाकते असे म्हणतात. प्रत्येक दिवशी त्यात मोठा बदल होतो. डिजिटल पेमेंटच्या युगात पण बदल होत आहे. सुरुवातीला रोखीत व्यवहाराचे युग होते. त्यानंतर डेबिट आणि क्रेडिट कार्डचे माध्यम आले. पण कार्ड प्रत्येक ठिकाणी स्वीकारले जात नव्हते. त्यानंतर किरकोळ व्यवहारात खरी क्रांती आणली ती UPI डिजिटल पेमेंटने. या क्रांतीने भारतीय अर्थव्यवस्थेला बुस्टिंग मिळाले. भारतीय युपीआय डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) डंका आता युरोपपासून तर पूर्वोत्तर देशापर्यंत वाजला आहे. पण डिजिटल पेमेंटपुरतेच तंत्रज्ञान मर्यादीत राहिले नाही. त्यात ॲमेझॉन वन सर्व्हिसने (Amazon One Service ) पुन्हा एक डिजिटल झेप घेतली आहे. तुम्हाला एकदम झटपट पेमेंट करता येईल, ते पण कोणत्या कार्ड आणि मोबाईल ॲपशिवाय..
UPI डिजिटल पेमेंट
युपीआय डिजिटल पेमेंटसाठी तुमच्याकडे स्मार्ट मोबाईल असणे गरजेचे आहे. सध्या डिजिटल पेमेंटचा सर्रास वापर सुरु आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम आणि इतर अनेक डिजिटल पेमेंट ॲपचा बोलबाला आहे. हे सर्व युपीआयचा वापर करतात. पण ॲमेझॉन वन सर्व्हिसने डिजिटल पेमेंटमध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे.
काय आहे तंत्रज्ञान
आता डिजिटल पेमेंटसाठी कार्ड, मोबाईल ॲपची गरज नाही. ॲमेझॉनने जबरदस्त तंत्रज्ञान आणले आहे. त्यासाठी कोणत्याही क्रेडिट, डेबिट कार्डची ग्राहकाला गरज भासत नाही. त्याला मोबाईलमधील युपीआय अथवा इतर ॲपची गरज नाही. मग कशाच्या आधारावर डिजिटल पेमेंट करता येईल?
आपला हात जगन्नाथ
हे तंत्रज्ञान तुमच्या हाताच्या आधारे काम करते. केवळ हाताच्या आधारे तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. त्याची सुरुवात Whole Foods स्टोअर पासून सुरु झाली आहे. हे तंत्रज्ञान Amazon Prime च्या काही सदस्यांना यापूर्वीच देण्यात आले आहे. ॲमेझॉन वन सर्व्हिस लवकरच इतर स्टोअर्सवर सुरु होईल. प्राईम मेंबरला या सेवेसाठी खास सवलत, सूट पण देण्यात येणार आहे.
येथे करावी लागेल नोंद
या सेवेचा लाभ घेण्यासाठी सदस्याला Amazon One Kiosk वर नोंदणी करावी लागेल. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला डेबिट कार्डला टर्मिनलमध्ये ठेवावे लागेल. रिडरवर तुम्हाला तुमचा हात ठेवावा लागेल. त्यानंतर मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. नोंदणी पूर्ण झाल्यावर ॲमेझॉन वन सर्व्हिसचा वापर करता येईल.
हातच का बरं
तुमच्या मनात प्रश्न असेल की, या सेवेसाठी ॲमेझॉनने हाताचीच निवड का केली असेल? आपल्या फिंगरप्रिंटसारखाच आपला हात पण युनिक असतो. तो जगात एकमेव असतो. बोटांच्या ठशासारखाच प्रत्येक व्यक्तीचा हाताचा पंजा पण वेगवेगळा असतो. हाताचे क्लोनिंग पण लवकर करता येत नाही.
सुरक्षेचे काय
ग्राहकाची गोपनियता आणि सुरक्षेसाठी ॲमेझॉन वन सर्व्हिसमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. ग्राहकाचा हा डेटा कोणत्याही तिसऱ्या कंपनीला, सेवा पुरवठादाराला शेअर करण्यात येत नाही. एखाद्या सरकारच्या आदेशानंतर डेटा शेअर करण्यात येतो. युझर्सचा बायोमॅट्रिक डेटा हा AWS Cloud मध्येच जतन करण्यात येतो. त्यामुळे तो सुरक्षित राहतो.