जगभरापेक्षा भारतात ‘अॅपल आयफोन 12’ची किंमत सर्वात जास्त आहे. परंतु, आपण अॅपलच्या अधिकृत स्टोअरमधून आयफोन विकत घेतल्यास कंपनी आपल्याला काही अतिरिक्त फायदे देखील देते. अॅपलच्या अधिकृत स्टोअरमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी ट्रेड-इनचा पर्याय देते.
जुन्या फोन एक्सचेंजवर अॅपलकडून खूप चांगली सूट दिली जाते. आयफोन 12 बद्दल बोलायचे झाले तर, या फोनवर कंपनी सध्या 22,000 रुपयांपर्यंतची सवलत देत आहे. अर्थात एक्सचेंज करण्याच्या फोननुसार सवलतीच्या किंमती निश्चित केल्या जातील. सध्या या फोनची किंमत 79,000 रुपयांपासून सुरू होत आहे. शिवाय कंपनी यावर ईएमआयचा पर्यायसुद्धा देत आहे.
आपण ट्रेड-इनचा पर्याय निवडल्यास त्यासाठी कंपनीने काही लोकप्रिय फोनची यादी तयार केली आहे आणि त्यांची किंमत देखील ठरवली आहे. अॅपल ट्रेड-इन पर्यायाद्वारे आपल्या फोनचे सध्य मूल्य जाणून घेण्यासाठी आपल्याला खरेदीच्या प्रक्रियेदरम्यान काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
अॅपल सुरुवातीला फोन एक्सचेंज करण्यासाठी त्याचा सिरीयल क्रमांक विचारेल. वापरकर्त्यांना अँड्रॉइड स्मार्टफोनचे एक्सचेंज करायचे असल्यास त्यांना फोनचा आयएमईआय कोड द्यावा लागेल. यानंतर, वापरकर्त्यास फोनच्या स्टोरेज आणि सामान्य स्थितीबद्दल प्रश्न विचारले जातील.
वापरकर्त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देताच त्यांना त्यांच्या सध्याच्या फोनचे मूल्य सांगितले जाईल. नवीन आयफोन खरेदी करताना त्या किमतीतून सदर रक्कम कमी होईल. ट्रेड-इन पर्यायाद्वारे खरेदी प्रक्रिया पूर्ण होताच अॅपलला स्मार्टफोनद्वारे ट्रेड-इनसाठी सूचना दिल्या जातील.
यानंतर, जो कोणी तुमच्याकडे आयफोनची डिलिव्हरी देण्यास येईल, तो तुमच्या फोनची पुन्हा तपासणी करेल आणि फोनची स्थिती जाणून घेईल. जर फोन दिलेल्या माहितीप्रमाणे सुव्यवस्थित दिसला तरच ट्रेड-इन आणि खरेदी प्रक्रिया पूर्ण होईल.