देशातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना लागू केली आहे. या योजनेसंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. नागरिकांना या योजनेचा फायदा घेण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. आरोग्य सुविधा कार्ड सहज नागरिकांना उपलब्ध व्हावे यासाठी गुगलची मदत घेण्यात येणार आहे. काही दिवसातच गुगलवर आयुष्यमान भारत कार्ड उपलब्ध होईल. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (AB PM-JAY) लाभ घेण्यासाठी हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. लवकरच हे कार्ड गुगल वॉलेटवर उपलब्ध होतील. त्याचे अनेक फायदे नागरिकांना मिळतील.
2025 पासून गुगल वॉलेटवर मिळेल हेल्थ कार्ड
गुगलने याविषयीची माहिती, गुगल ब्लॉगवर पोस्ट केली आहे. आयुष्मान भारत हेल्थ कार्ड (ABHA ID) 2025 पासून गुगल वॉलेटवर उपलब्ध असेल. या योजनेचे फायदे डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करण्यात येणार आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशनतंर्गत (ABDM) ही सुविधा देण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने गुगलच्या सोबत या कामासाठी हात मिळवला आहे. त्यातंर्गत हेल्थ कार्ड डिजिटल स्वरुपात गुगल वॉलेटवर उपलब्ध असेल. योजनेचा जनतेपर्यंत त्वरीत फायदा पोहचवण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे.
ABHA-ID गुगल वॉलेटवर असल्याने मोठा फायदा
पूर्वी जे काम करण्यासाठी अगोदर 6 महिने लागत होते. ते आता अवघ्या दोन आठवड्यात होत आहेत, असे गुगलने स्पष्ट केले आहे. ABHA ID कार्ड गुगल वॉलेटवर उपलब्ध झाल्यावर नागरिक त्यांचे मेडिकल रेकॉर्ड, लॅब टेस्ट रिपोर्ट आणि औषधांची पावती सहज गुगल वॉलेटवर जतन करू शकतील. हे रिपोर्ट ते आरोग्य केंद्र, डॉक्टरांसोबत शेअर करू शकतील.
नागरिकांचे आरोग्याची सविस्तर माहिती. त्यांच्या आजाराची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी युझर्स त्यांचा फोन फिंगरप्रिंट, पिन वा पासकोडच्या माध्यमातून सुरक्षित ठेऊ शकतील. ABHA आयडी कार्ड क्रमांक तुमच्या आरोग्याची कुंडली सुरक्षित ठेवील. या मोहिमेमुळे डिजिटल हेल्थला चालना मिळेल.