मुंबई : पासपोर्ट हा मुख्य दस्ताऐवजांपैकी एक आहे. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी आवश्यक कागदपत्र आहे. आधुनिक युगासोबत आता पासपोर्टही कात टाकण्यास सज्ज आहे. अर्थात पासपोर्टचं इलेक्ट्रॉनिक स्वरुप येणार आहे. तुमच्या पासपोर्टच्या बुकलेटमध्ये चिप येणार आहे. या चिपमध्ये संपूर्ण माहिती इलेक्ट्रिक स्वरुपात नमूद केली जाणार आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून जवळपास 10 लाख ई पासपोर्ट जारी केले जाणार आहेत. सुरुवातीला कमी गर्दी असलेल्या केंद्रांवर ई पासपोर्टची सुविधा सुरु केली जाणार आहे. म्हणजेच येत्या काही दिवसात ई पासपोर्ट मिळणार आहेत.
ई- पासपोर्ट सामन्य फिजिकल पासपोर्टसारखाच असणार आहे. मात्र वेगळं स्वरुप म्हणजे यात छोटी इलेक्ट्रिक चिप असणार आहे. सध्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर असलेल्या चिपसारखं असणआर आहे. या चिपमध्ये महत्त्वपूर्ण डेटा असणार आहे. यात तुमचं नाव, जन्म तारीख, घराचा पत्ता इत्यादींचा समावेश असणार आहे. ई पासपोर्टमध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFID) चिप असणार आहे. त्यामुळे एअरपोर्टवर झटपट प्रवाशी ओळख करणं सोपं होईल.
ई पासपोर्टमुळे बनावट पासपोर्ट आळा बसणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर डेटा टॅम्परिंगसारख्या घटना रोखता येणार आहेत. त्यामुळे फेस पासपोर्ट बनवणं जवळपास अशक्य होईल, असं पासपोर्ट अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या 100 हून अधिक देशात ई पासपोर्टचं वितरण केलं जात आहे.
ई पासपोर्टसाठी मॅनेजमेंट सिस्टम, इंटरऑपरेबिलिटी टेस्ट बेड, प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट, ई पर्सनलायझेशन, ई पासपोर्ट व्हेरिफिकेशन, इमिग्रेशन चेकपोस्टसारखा तांत्रिक आराखडा तयार केला जात आहे. हे संपूर्ण नेटवर्क जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
चिप असणारी बुकलेट नाशिकच्या मुद्रणालयात प्रिंट केली जाणार आहे. आतापर्यंत 4.5 कोटी बुकलेटची ऑर्डर दिली गेली आहे. पहिल्यांदा परराष्ट्र मंत्रालयाने 70 लाख बुकलेट प्रिंट करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आता देशातील जवळपास 10 कोटी लोकांकडे पासपोर्ट आहेत. त्यामुळे टप्प्याटप्याने हे पासपोर्टही अपग्रेड केले जातील.