नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) म्हणजे ट्विटर (Twitter) मोफत वापरण्याचे दिवस संपले आहेत. मालक आणि जगातील अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) याने याविषयीचे संकेत दिले आहेत. आता एक्स प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी सर्वांनाच सरसकट पैसे मोजावे लागतील. बीबीसीने याविषयीचे वृ्त्त दिले आहे. गेल्या वर्षी ट्विटरचा कारभार हातात घेतल्यापासून मस्क याचे प्रयोग थांबता थांबताना दिसत नाही. मस्कचे राज्य आल्यापासून ट्विटरमध्ये नाव, लोगोच नाही तर अनेक बदलांची नांदी आली आहे. मस्क या सोशल प्लॅटफॉर्मचा वापर फेसबूक, इन्स्टाग्रामला टफ फाईट देण्यासाठी करत आहे. तसेच त्याला या माध्यमातून मोठा महसूल गोळा करायचा आहे. त्याने एका वर्षात अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकले. तर काहींनी भर बैठकीत सामूहिक राजीनामे दिले. यापूर्वी खास सुविधांसाठी युझर्सला पैसा मोजावा लागत होता.
असे दिले संकेत
बीबीसीच्या वृत्तानुसार, एलॉन मस्क याने इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी 18 सप्टेंबर बातचीत केली. त्यादरम्यान त्याने हा प्लॅन सांगितला. त्यानुसार, एक्सचे वापरकर्ते 550 दशलक्षच्या घरात आहे. या सोशल प्लॅटफॉर्मवर प्रत्येक दिवशी 100 ते 200 दशलक्ष पोस्ट करण्यात येतात. पण एक्सवर कोणत्याही व्यक्ती समूह, धार्मिक, वांशिक समूहाबद्दल भेदभाव, द्वेषपूर्वक पोस्ट करण्यास मज्जाव आहे. ज्यू संघटनेवर आरोप झाल्यानंतर मस्क यांच्यावर नाराजी पसरली होती.
किती करावे लागेल पेमेंट
बॉट्सला पराभूत करण्यासाठी आता एक्स, युझर्ससाठी पेमेंट व्यवस्था अनिवार्य करणार आहे. कंपनी त्यासाठी खास व्यवस्था करत आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी दर महिन्याला युझर्सला एक छोटी रक्कम अदा करावी लागेल. आता ही रक्कम किती असेल, हे अजून निश्चित झाले नाही. पण ही रक्कम मोठी नसेल, असे संकेत मस्क याने दिले. स्पेसएक्स (SpaceX) आणि टेस्लाचे (Tesla) बॉस एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटरची खरेदी केली होती.
बनावट खात्याला चेकमेट
यापूर्वी एलॉन मस्क याने ब्लू टीकचा प्रयोग राबवला होता. त्याच्या हट्टामुळे युझर्सने टीका केली. युझर्सची संख्या रोडावली. काहींनी ही रक्कम मोजाली. तर काहींनी ट्विटरकडे पाठ फिरवली. त्यानंतर मस्कने हा प्रयोग थांबवला. बनावट खाते हुडकून काढण्याचे काम त्याला जिकरीचे जात आहे. त्यामुळे अशा बनावट खातेदारांना चेकमेट देण्यासाठी मस्कने मासिक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पण त्याचा काय परिणाम होतो, हे लवकरच समोर येईल.