मुंबई : अॅप्पलने (Apple) काही तरी नवीन करण्याच्या नादात आपल्या फोनमधून अनेक फीचर्स काढून टाकले आहेत. अॅप्पलने प्रथम 3.5 मिमी ऑडिओ जॅक होल आणि नंतर टच आयडी रिमूव्ह केला आहे. आता अॅप्पल आपल्या आयफोनमधून आणखी एक फीचर काढून टाकावे लागणार आहे. याचे कारण ठरलयं युरोपियन युनियनने नुकताच लागू केलेला निर्णय. युरोपियन युनियनने (European Union) 2024 पर्यंत सर्व कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल फोन, टॅब्लेट आणि कॅमेरामध्ये समान चार्जिंग पोर्ट देण्याच्या सुचना केल्या आहेत. आता प्रत्येक फोन, टॅबलेट आणि कॅमेर्याला युएसबी (USB) टाइप-सी चार्जिंग पोर्ट सारखेच द्यावे लागणार असून या निर्णयाचा थेट परिणाम लाइटनिंग पोर्ट देणार्या अॅप्पलवर होणार आहे.
युरोपियन युनियनने गेल्या वर्षी युएसबी टाईप-सी पोर्टला सर्व प्रोडक्टसाठी स्टर्डड पोर्ट म्हणून घोषित केले होते. नुकत्याच जाहिर झालेल्या निर्णयामुळे अॅप्पलला सर्वाधिक फटका बसला आहे. वास्तविक, यूएसबी टाइप-सी पोर्ट बहुतेक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे, परंतु आता फोनच्या बॉक्समध्ये चार्जर न देणाऱ्या अॅप्पलला हा निर्णय मान्य करणे कठीण जात आहे. अॅप्पलच्या कमाईवरही याचा मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. अॅप्पल आपल्या बॉक्समध्ये चार्जर देत नाही. त्यामुळे यूजर्सना यासाठी वेगळा चार्जर घ्यावा लागतो. कंपनी लाइटनिंग केबलचा पुरवठा करत असते. युजर्सना अडॅप्टरसाठी पैसे खर्च करावे लागतात. आता जेव्हा सर्व उपकरणांमध्ये एकच चार्जर असेल, तेव्हा अॅप्पलच्या व्यवसायावर त्याचा परिणाम नक्कीच होणार आहे.
दरम्यान, या वर्षी लाँच होणार्या आयफोन 14 सिरीजचे प्रोडक्शन अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत कंपनीला कोणतेही बदल करणे शक्य नाही. असं असलं तरी, युरोपियन युनियनने स्मार्टफोन कंपन्यांना 2024 पर्यंत स्थगिती दिली आहे. अॅप्पल पुढील वर्षी किंवा 2024 मध्ये लाँच होणार्या आयफोन सीरिजमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट देईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
अॅप्पल आपल्या फोनबॉक्समध्ये चार्जर देत नाही. हे सर्वांना माहीत आहे. मात्र, काही देशांमध्ये अॅप्पलला फोनसोबत बॉक्समध्ये चार्जर द्यावा लागतो. ब्राझील हा त्यातील असाच एक देश आहे. भारतातही कंपनी चार्जरशिवाय फोन विकते. अॅप्पल फक्त युरोपियन युनियन प्रदेशात टाइप-सी पोर्टसह स्मार्टफोन पुरवेल, अशी शक्यता आहे. जगातील इतर देशांमध्ये, कंपनी फक्त लाइटनिंग पोर्टसह आयफोन विकू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.