नागपूर : फेसबूक सोशल नेटवर्किंगचं सर्वात प्रभावी माध्यम, देशातील मोठा नेटकरी वर्ग फेसबूकच्या माध्यमातून सोशली कनेक्ट झालाय. पण आता फेसबूक भारतात लहान व मध्यम उद्योगांना 50 लाखांपर्यंत कर्जंही देणार आहेत. कर्ज देण्यासाठी फेसबूकने ‘इंडिफाय’ कंपनीसोबत करार केलाय, ही कंपनी भारतात लघू आणि मध्यम उद्योगांना कर्जवाटप करते. फेसबूकने देशभरातील 200 शहरात कर्ज देण्यासाठी सोय उपलब्ध केली आहे. पण फेसबूककडून कर्ज घेण्यासाठी फक्त ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. यातूनंच सायबर गुन्हेगारांना आयतं सावज मिळून फसवणूक होण्याचा धोकाही सायबर तज्ज्ञांकडून वर्तवला जातो आहे.
‘फेसबुकने लहान व मध्यम उद्योजकांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनात आर्थिक संकटात असलेल्या छोट्या – मोठ्या उद्योगांना उभारी देण्यासाठी याचा फायदा होऊ शततो, पण लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेल्या व्यापाऱ्यांना, त्यांच्या गरजेचा फायदा घेऊन सोशल मिडियावरील सायबर गुन्हेगार नवा सावज हेरण्याची भिती आहे. फेसबुकसारख्याच फेक वेबसाईट तयार करून फसवे, फेक मेसेज पाठवून सायबर गुन्हेगार गरजू व्यापाऱ्यांना टार्गेट करुन आपल्या जाळ्यात ओढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
अशाच प्रकारे अनेतांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांनी यापूर्वीही डल्ला मारलाय, त्यामुळे फेसबूककडे कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करताना, सावध राहा’ असं आवाहन सायबर तज्ज्ञ अजित पारसे (Ajit Parase) यांनी केलं आहे.
फेसबुकने ‘इंडिफाय’ या कंपनीसोबत करार केला असून लघु व मध्यम उद्योगांना कर्ज देऊन त्यांना नवी उभारी देण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकले. विशेष म्हणजे फेसबुकची ही कर्ज सेवा ऑनलाईन अर्ज करूनच मिळणार आहे. त्यामुळे आता फेसबुकसारखेच संकेतस्थळ, अनधिकृत मोबाईल अप्लिकेशन तयार होण्याची शक्यता आहे. फेसबुक प्रत्येकाच्याच ओळखीचे व विश्वासाचे असल्याने त्याचा गैरवापर करीत बॅंकेचे ओटीपीही हस्तगत करून सायबर गुन्हेगार कुणाचीही फसवणूक करू शकतात, अशी भीतीही अजित पारसे यांंनी व्यक्त केली आहे.
विविध अनधिकृत मोबाईल अप्लिकेशन्सचा वापर करून फसवे कॉल करून व्यापाऱ्यांची लूट करण्याचीही शक्यता आहे. सायबर गुन्हेगार बनावटी एकसारख्या दिसणाऱ्या वेबसाईट्स बनवून संबंधित व्यापारी, उद्योजकांची कागदपत्रे, बँक खात्यासह हस्तगत करू शकतात. कोरोनामुळे प्रत्येकच उद्योग मंदावला असून उद्योजकांंना आर्थिक मदतीची गरज आहे. नेमकी हीच बाब हेरून सायबर गुन्हेगार अशा लोकांना लक्ष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेसबुकपेक्षा कमी व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष फेसबुकसारख्याच संकेतस्थळ, ॲप्लिकेशन्स तयार करून सायबर गुन्हेगार पाठवू शकतात. परिणामी मोठ्या फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही.
फेसबूकने महिला उद्योजकांना कमी व्याजदराने कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाय, महिला उद्योजकांच्या औद्योगिक विकासासाठी हा चांगला निर्णय आहे. पण यामुळे सायबर गुन्हेगारांकडून महिला उद्योजकांच्या फसवणूकीचीही जास्त भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ‘फेसबुक कर्जाच्या नावावर आर्थिक व्यवहार करताना संबंधित व्यक्ती अधिकृत प्रतिनिधी आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांनी सोशल मीडियाचा वापर आर्थिकदृष्ट्या गरज असलेल्यांची रेकी करण्यासाठी सुरू केला आहे. त्यामुळे उद्योजक किंवा व्यापाऱ्यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती अनोळखी यूजर्ससोबत पोस्ट करू नका. बेसावध, बेजाबदार पोस्टमुळे नागरिक सायबर गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट ठरू शकते. त्यामुळे फेसबूककडून कर्ज घेताना प्रत्येक पाऊल सावधपणे टाकण्याची गरज आहे.
(Facebook to lend up to Rs 50 lakh, service available in 200 cities, but cyber experts warn users)
हे ही वाचा :
सावधान! तुमच्याभोवतीही सेक्सटॉर्शनचं जाळं, नव्या सायबर क्राईमचं पोलिसांसमोर चॅलेंज