मुंबई : आजच्या युगात सोशल मीडिया अनेक लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर तर अनेक मेसेज एकमेकांना फॉरवर्ड केले जातात. आता व्हॉट्सअपविषयीचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात दररोज रात्री 11.30 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत व्हॉट्सअप बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच संबंधित मेसेज 48 तासात आपल्या संपर्क यादीतील लोकांना फॉरवर्ड केला नाही, तर तुमचे खाते बंद होईल. हे बंद खाते सुरु करण्यासाठी 499 रुपये द्यावे लागतील, असेही सांगण्यात येत आहे.
व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या या मेसेजमधील या दाव्याने अनेक युजर्स बुचकळ्यात पडले आहेत. काहींनी तर धोका पत्करायला नको म्हणून हे मेसेज पुढे पाठवायलाही सुरुवात केली आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे, “यापुढे भारतात रात्री 11.30 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत व्हॉट्सअपचा वापर करता येणार नाही. या वेळेत व्हॉट्सअप पूर्णपणे बंद असेल. मोदी सरकार व्हॉट्सअपच्या वापराबाबत लवकरच एक नवा कायदा आणणार आहे. हा मेसेज 48 तासात आपल्या संपर्क यादीतील 10 लोकांना फॉरवर्ड केला नाही, तर तुमचे खाते बंद होईल. हे बंद खाते सुरु करण्यासाठी 499 रुपये द्यावे लागतील.”
या दाव्यामागील वास्तव काय?
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अशा प्रकारची कोणतीही अधिकृत सुचना दिलेली नाही. तसेच कोणत्याही सोशल मीडिया कंपनीने याची अधिकृत घोषणा केलेली नाही. संबंधित दावा पूर्णपणे खोटा आहे. संबंधित मेसेज पुढे फॉरवर्ड केला नाही तर तुमचे व्हॉट्सअप बंद होईल आणि पुन्हा सुरु करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी कोणतीही भिती बाळगण्याचे कारण नाही.
खरंतर बुधवारी (3 जुलै) व्हॉट्सअप, फेसबूक आणि इंस्टाग्रामची सेवा 9 तासांसाठी ठप्प झाली होती. या काळात व्हॉट्सअप युजर्सला फोटो अपलोड किंवा डाऊनलोड करण्यात अडथळे येत होते. याचाच फायदा उठवत संबंधित खोटा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला.
दरम्यान, आज एअरटेल कंपनीने आपल्या सर्व ग्राहकांना मेसेज पाठवत असे अडथळे आले होते आणि आता ते दूर करण्यात आल्याचे अधिकृतपणे कळवले आहे.