मुंबई : ॲपल या जगप्रसिद्ध कंपनीने भारतात पहिले Apple Store लाँच केले आहे. आयफोन निर्माता कंपनीचे सीईओ टिम कुक (tim cook) यांनी मुंबईत Apple BKC स्टोअरचे आज उद्घाटन केले. मात्र हे उद्घाटन करताना लाल रिबिन कापली गेली नाही किंवा कात्रीही वापरावी लागली नाही. कुक यांनी थेट ॲपल स्टोअरचा दरवाजा उघडला. Apple ने भारतात 25 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर पहिले स्टोअर लॉन्च (first store in India) केले आहे.
मुंबईनंतर आता दिल्लीची पाळी आहे कारण भारतातील दुसरे ॲपल स्टोअर 20 एप्रिल रोजी साकेतमध्ये उघडणार आहे. भारतात ॲपल स्टोअर सुरू झाल्यानंतर आता ग्राहकांना कंपनीच्या उत्पादनांचा आणि सेवांचा थेट लाभ मिळणार आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन बाजारपेठांपैकी एक आहे. त्यामुळे ॲपललाही एवढी मोठी बाजारपेठ हाताबाहेर जाऊ द्यायची नाही. Apple Store लाँच केल्यामुळे कंपनीला भारतीय ग्राहकांशी थेट कनेक्ट होण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय ॲपलच्या उत्कृष्ट सेवेचा लाभही ग्राहकांना घेता येणार आहे.
25 देशांमध्ये 552 ॲपल स्टोअर्स
दरम्यान या लॉन्चिंगपूर्वीच मुंबईतील ॲपल स्टोअरमध्ये मोठी गर्दी जमली होती. हे सर्व लोक भारतातील पहिल्या ॲपल स्टोअरचे साक्षीदार आहेत. मुंबईतील ॲपल बीकेसी आणि दिल्लीतील ॲपल साकेत नंतर, ॲपल स्टोअरची एकूण संख्या 552 पर्यंत पोहोचेल. यामध्ये क्युपर्टिनोमधील ॲपल पार्क व्हिजिटर सेंटरचा समावेश आहे. जगभरात आयफोन आणि इतर उत्पादने विकणाऱ्या ॲपल कंपनीची 25 देशांमध्ये Apple स्टोअर्स आहेत.
#WATCH | Apple CEO Tim Cook opens the gates to India’s first Apple store at Mumbai’s Bandra Kurla Complex pic.twitter.com/MCMzspFrvp
— ANI (@ANI) April 18, 2023
सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहील ॲपल स्टोअर
मुंबईतील ॲपल स्टोअरच्या नेमक्या लोकेशनविषयी सांगायचे झाले तर ते बीकेसी येथील जिओ वर्ल्ड येथे आहे. कंपनीने त्याची वेळही जाहीर केली आहे. ॲपल स्टोअर सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आठवड्याचे सातही दिवस तुम्ही येथील सेवेचा लाभ घेऊ शकता. स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे.
20 हून अधिक भाषा बोलू शकणारे कर्मचारी
बीकेसी येथील ॲपल स्टोअरमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत जे 20 पेक्षा जास्त भाषा बोलू शकतात. मुंबईतील ॲपल स्टोअर जगाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांचे स्वागत करत आहे. येथे त्यांना सर्वोत्तम उत्पादने आणि सेवांचे तपशील दिले जातील. ॲपल ट्रेड इन प्रोग्रामची सुविधा देखील स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.