नवी दिल्ली | 28 नोव्हेंबर 2023 : तुमच्याकडे गुगलचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गुगलने काही खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कारण पण दिले आहे. तुमचे खाते किती दिवस झाले वापरात नाही, म्हणजे किती दिवसापूर्वी तुम्ही गुगलचे खाते लॉगिन इन केले होते? आठवते का? जर आठवत नसेल तर मात्र अवघड आहे. कारण हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला हे खाते लवकरात लवकर सक्रिय करावे लागणार आहे. हे खाते सक्रिय नसेल तर ते कायमचेच बंद होऊ शकते. मग तुम्हाला काहीच करता येणार नाही. फरगेट पासवर्ड वा ई-मेलचा वापर करुन ते पुन्हा सक्रिय (active) करता येणार नाही. काय घेतला आहे गुगलने निर्णय, कोणाला बसेल त्याचा फटका, घ्या जाणून…
ही खाती होणार बंद
गुगलने याविषयीची घोषणा केली आहे. त्यानुसार, निष्क्रिय खाती बंद करण्याची मोहिम सुरु करण्यात येत आहे. या आठवड्यापासून या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात येत आहे. या मे महिन्यातच गुगलने याविषयीचा इशारा दिला होता. त्यानुसार, जी खाते गेल्या दोन वर्षांत वापरात आली नाही, ती बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या खात्यात तुमची महत्वाची माहिती असेल तर ती पण कायमची गायब होईल. या आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात ही खाती बंद होण्यास सुरुवात होत आहे.
खाते बंद होण्याची सूचना
तुमचे खाते गेल्या दोन वर्षांत वापरत नसेल तर त्याविषयीचे अनेक नोटीस तुमच्या ई-मेल खात्यावर अथवा रिकव्हरी खात्यावर पाठविण्यात आले आहे. गुगलने यापूर्वीच युझर्सला खाते बंद करण्याची सूचना दिली आहे. तुम्ही जर हे मेल चेक केले नसेल तर तातडीने तुमचे खाते तपासा. एखादा खाते वापरात आले तर ते बंद होण्याची टांगती तलवार पण राहणार नाही. Google Drive, Docs, Gmail आणि इतर खाती बंद होतील. त्यामुळे त्यावरील महत्वाची माहिती गायब होईल.
या कारणामुळे ही कारवाई
यावर्षी मे महिन्यात गुगलने याविषयीची माहिती दिली होती. सुरक्षेच्या कारणास्तव गुगलने ही कारवाई सुरु केली आहे. अशा बंद खात्याचा वापर इतर कामासाठी, चुकीचा कामासाठी होऊ शकतो. त्याआधारे धमकी वा इतर असुरक्षित कामासाठी वापर होण्याची शक्यता लक्षात घेता, ही कारवाई करण्यात येत आहे.
काय आहे सवलत
केवळ वैयक्तिक खात्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. जर वैयक्तिक खाती दोन वर्षांसाठी बंद असतील आणि त्याचा वापर झाला नसेल तर ती कायमची बंद करण्यात येणार आहे. शाळा, संस्था वा अन्य संघटनांच्या ई-मेलसाठी हा धोका नाही. त्यामुळे वैयक्तिक युझर्सने तातडीने हे खाते लॉगिन करावे असा सल्ला देण्यात आला आहे.