मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सप्टेंबर 2016 मध्ये जिओ लाँच केल्यापासून भारतीय दूरसंचार क्षेत्रात डेटा क्रांती घडली आहे. अनेक कंपन्यांना इच्छा नसतानाही डेटाचे दर कमी करावे लागले. त्यामुळे भारतात पूर्वीच्या तुलनेत डेटा अत्यंत स्वस्त झालाय. Cable.co.uk च्या रिपोर्टनुसार, भारतात 1GB डेटाची किंमत सरासरी 18.5 रुपये आहे, तर जागतिक स्तरावर ही सरासरी किंमत 600 रुपये आहे.
कंपनीकडून 230 देशांमधील डेटा दरांचं विश्लेषण करण्यात आल्यानंतर हा रिपोर्ट जारी करण्यात आलाय. भारतात 1GB डेटाची किंमत 0.26 डॉलर असल्याचा निष्कर्ष या रिपोर्टमधून काढण्यात आला. ब्रिटनमध्ये ग्राहकांना 1GB डेटासाठी 6.66 डॉलर म्हणजेच 468 रुपये मोजावे लागतात, तर अमेरिकेत 1GB डेटासाठी ग्राहकांचे 12.37 डॉलर म्हणजे तब्बल 869 रुपये खर्च होतात.
जागतिक स्तरावर 1GB डेटाची सरासरी किंमत 8.53 डॉलर म्हणजे 600 रुपये आहे. तरुण वर्ग जास्त असणाऱ्या देशांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता अधिक आहे. भारत हे एक जिवंत मोबाईल मार्केट असल्याचा निष्कर्षही या अभ्यासातून नोंदवण्यात आलाय. भारत जगातला सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. कारण, भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.
भारतात 43 कोटींपेक्षा अधिक स्मार्टफोन युझर्स आहेत. चीननंतर भारत स्मार्टफोनसाठी सर्वात मोठं मार्केट आहे. मुकेश अंबानी यांनी सप्टेंबर 2016 मध्ये जिओ लाँच करत दूरसंचार कंपन्यांची झोप उडवली होती. भारतातही 1GB डेटासाठी 300 ते 400 रुपये मोजावे लागत होते. पण जिओनंतर यामध्ये मोठा बदल घडून आला. डेटासोबतच व्हॉईस कॉलिंगसाठीही कंपन्यांकडून आकर्षक ऑफर देणं सुरु झालं.