नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : देशातील नागरिकांना लवकरच चिप बसवलेली आधुनिक पासपोर्ट जारी केले जाणार आहेत. या पासपोर्टसाठीच्या सर्व चाचण्या सफल झाल्या आहेत. नाशिकच्या इंडीयन सिक्युरिटी प्रेसमध्ये पहिल्या वर्षी 70 लाख ई-पासपोर्टची ब्लॅंक बुकलेट छापली जात आहे. नाशिक प्रेसला 4.5 कोटी चिप पासपोर्ट छपाईची ऑर्डर मिळाली आहे. या पासपोर्टमध्ये कॉम्प्युटर मायक्रो चिप बसवलेली असणार आहे. या चिपमुळे बनावट पासपोर्ट तयार करण्याला आळा तर बसणारच आहे शिवाय इमिग्रेशनचा वेळ वाचणार आहे.
भारतात आता पारंपारिक पासपोर्ट ऐवजी अत्याधुनिक चिपवाले पासपोर्ट जारी केले जाणार आहेत. इंटरनॅशनल सिव्हील एव्हीएशन ऑर्गनायझेशन ( ICAO ) संघटनेने यासाठी मानके जाहीर केली आहेत. या पासपोर्टमध्ये 14 एडवान्स फिचर आहेत. या पासपोर्टना 140 देशाच्या विमानतळांवर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येथे इमिग्रेशन प्रक्रीया झटपट होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. हे पासपोर्ट दिसायला सध्याच्या बुकलेट पासपोर्टसारखेच असणार आहेत. परंतू आतील पानांवर एक रेडीयो फ्रीक्वेन्सी आयडेंटीफिकेशन चिप आणि शेवटी फोल्डेबल एंटेना असणार आहे.
नव्या पासपोर्टच्या चिपमध्ये नागरिकांची बायोमेट्रीक डीटेल्स आणि सर्व माहीती नमूद केलेली असणार आहे. जी बुकलेट पासपोर्टमध्ये असते. पासपोर्ट सर्व्हीस प्रोग्राम 2.0 ( पीएसपी ) नावाची ही योजना लागू होणार आहे. चिपवाल्या पासपोर्टसाठी केंद्रांवर गर्दी होऊ यासाठी टप्प्या टप्प्याने ही योजना लागू होणार आहे. त्यासाठी पासपोर्ट सेंटर्सचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.
ई-पासपोर्टसाठी विमानतळावर आधुनिक बायोमेट्रीक सिस्टीम लावली जाणार आहे. पासपोर्टमधील इमेज आणि इमिग्रेशनवेळी मिळणारी लाईव्ह इमेज सेंकदात पडताळली जाईल. जर कोणी सारख्याच चेहऱ्याची व्यक्ती आली तर ती लागलीच पकडली जाईल. जुन्या पासपोर्टमध्ये जुन्या फोटो आणि प्रत्यक्षातील व्यक्ती यांच्या चेहऱ्यातील बदल पकडणे शक्य नव्हते. परदेशातील चिप रिडरशी आपल्या चिप पासपोर्टची ताळमेळ बसण्यासाठी तपासण्या केल्या जात आहेत.