नवी दिल्ली : कार्बन मोबाईलनंतर आता इंटेक्स टेक्नोलॉजीही भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये फोन बनवणाऱ्या कंपन्यांच्या यादीतून लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे. चिनी कंपन्यांचा भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये असलेला दबदबा हे यामागचं मुख्य कारण आहे. इंटेक्स एकेकाळी भारतीय मार्केटमध्ये मायक्रोमॅक्सनंतर सर्वात मोठी दुसरी कंपनी होती. त्यावेळी कंपनीचा मार्केटमधील हिस्सा 13 टक्के होता. पण आता प्लांट पूर्णपणे बंद पडलाय, ज्यामुळे ही भारतीय कंपनी स्मार्टफोन मार्केट सोडणार असल्याचं स्पष्ट होतंय.
यापूर्वी ‘MILK’ म्हणजेच मायक्रोमॅक्स (M), इंटेक्स (I), लावा (L) आणि कार्बन (K) या चार भारतातल्या प्रमुख कंपन्या होत्या. पण इंटेक्स गेल्यानंतर मायक्रोमॅक्स आणि लावा कंपन्याच उरतील. पण मायक्रोमॅक्स आणि लावा यांची परिस्थितीही अत्यंत खराब आहे. काऊंटरपॉईंटच्या रिसर्चनुसार, ‘MILK’ प्लेयरचा मार्चपर्यंत मार्केटमध्ये केवळ 3 टक्के शेअर उरलाय.
2015 मध्ये हा आकडा 40 टक्के होता. दुसरीकडे सध्या 65 टक्के शेअर चायनीज कंपन्यांचा झालाय. इंटेक्सकडून गेल्या अनेक महिन्यांपासून नवा फोन लाँच करण्यात आलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, 500 कोटी रुपये गुंतवणूक केलेला नोएडाचा प्लांट विक्रीला काढल्याचंही बोललं जातंय. कंपनीने या प्लांटमध्ये 1500 कोटींची गुंतवणूक केली होती, ज्यामध्ये एका वर्षात 40 मिलियन फोन तयार करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. पण आता या प्लांटची गरज उरलेली नाही.
इंटेक्सचे संचालक केशव बन्सल यांच्या मते, कंपनीचा व्यवसाय कमी झालाय. संपूर्ण भागात ग्रेटर नोएडाचा प्लांट महत्त्वाचा होता. पण आता मार्केटमधून बाहेर गेल्यानंतर नवा पर्याय शोधत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
चायनीज कंपन्यांकडून दमदार फीचर्ससह एकामागोमाग एक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत, ज्याला भारतात मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. या कंपन्यांना तोंड न देऊ शकल्याने भारतीय कंपन्यांवर ही वेळ आली आहे. फायदा होत नसल्याने भारतीय कंपन्या बंद होत आहेत. कारण, ग्राहकांची पसंती चायनीज फोनला आहे.