IIT सारख्या संस्थांमधून शिक्षण घेतल्यानंतर अनेकांचे नशीब पालटते. जगभरातील बड्या टेक कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी मिळते. अथवा ते स्वतःचा काही तरी स्टार्टअप सुरु करतात. आयआयटी अभियंत्यांच्या पगाराची कायम चर्चा होते. हे पदवधीर त्यांच्या कौशल्याच्या जोरावर मोठी भरारी घेतात. शिक्षण पूर्ण होताच, त्यांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी चालून येते. पराग अग्रवाल यांनी आयुष्यात अनेक चढउतार बघितले आहे. पण आज त्यांनी स्वतःच्या हिकमतीवर मोठी कामगिरी बजावली आहे.
दाखवला बाहरेचा रस्ता
पराग अग्रवाल हे 2011 मध्ये मायक्रो ब्लॉग, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरमध्ये रुजू झाले. पण अकरा वर्षांनी, 2022 मध्ये एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले. मस्कने इतके प्रयोग आणि बदल केले की, त्याचा मोठा फटका ट्विटरला बसला. त्याचदरम्यान पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. अग्रवाल यंना 100 कोटींचे पॅकेज होते. नोकरी गेल्यानंतर त्यांनी मेहनतीने स्वतःची कंपनी उभारली. त्यांनी कंपनीसाठी जवळपास 250 कोटी रुपयांचे भांडवल पण उभारले आहे. एखाद्या स्टार्टअप्ससाठी ही मोठी कामगिरी म्हणावी लागेल.
कोण आहेत पराग अग्रवाल
पराग अग्रवाल एक भारतीय अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. 29 नोव्हेंबर 2021 रोजी ट्विटरचे तत्कालीन CEO जॅक डॉर्सी यांनी पराग अग्रवाल यांना त्यांचे पद देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2022 मध्ये एलॉन मस्क यांनी ट्विटर खऱेदी केले. त्यानंतर अग्रवाल यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजस्थानमधील अजमेर हे पराग यांचे मूळ शहर आहे. त्यांनी आयआयटी मुंबईतून बी.टेक पूर्ण केले. त्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी मास्टर ऑफ सायन्स आणि जेनिफर विंडम यांच्या नेतृत्वात PhD पूर्ण केली. त्यांचे वडील अटॉमिक विभागात वरिष्ठ पदावर अधिकारी होते. तर आई, मुंबईतील वीरमाता जीजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या.
एलॉन मस्क यांच्यामुळे गेली नोकरी
2022 मध्ये श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक प्रयोग राबविले. त्यात अग्रवाल यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. नोकरीतून काढल्यानंतर करारानुसार, कंपनीने त्यांना 400 कोटी रुपये देणे आवश्यक होते. पण मस्क याने हात वर केले. सध्या ट्विटरला एक्स (X) नावाने ओळखले जाते. पराग यांनी काही साथीदारांच्या मदतीने मस्क यांच्यावर 1000 कोटी रुपयांचा खटला दाखल केलेला आहे.