नवी दिल्ली : जगातील नवकोट नारायण मार्क झुकेरबर्गही (Mark Zuckerberg) सध्या चिंताग्रस्त आहे. कारण या प्रोजेक्टनं (Project) त्याला फायदा सोडा, मोठा तोटा झालाय. अर्थात या नवीन प्रकल्पामुळे त्यांच्या संपत्तीत (Wealth) मोठी घसरण झाली आहे. त्याला नुकसान सहन करावं लागलं आहे.
झुकेरबर्गने मेटावर्स (Metaverse) बाजारात दाखल केले. पण यामुळे तो चांगलाच गोत्यात आला आहे. त्याची संपत्ती थोडी थोडकी नव्हे तर 7100 कोटी रुपयांनी कमी झाली आहे. हा त्याला मोठा फटका मानण्यात येतो.
ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, (Bloomberg Billionaire Index) सध्या झुकेरबर्गची संपत्ती 55.9 बिलियन डॉलर आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत तो 20 व्या स्थानी आहे.
दोन वर्षांच्या त्याच्या संपत्तीचे आकडे डोळे विस्फरणारे होते. त्याची संपत्ती 106 अरब डॉलर होती. जागतिक श्रीमंतांच्या यादीत जेफ बेजोस आणि बिल गेट्स हे त्याच्या पुढे होते. सप्टेंबर 2021 मध्ये त्याची मालमत्ता 142 बिलियन डॉलरवर पोहचली होती. तर त्याच्या कंपनीच्या शेअरची किंमत 382 डॉलर वर पोहचली होती.
2021 च्या शेवटी झुकेरबर्गने त्याच्या फेसबुक कंपनीचे नाव बदलून ते मेटा प्लॅटफॉर्म ठेवले. पण हा निर्णय त्याच्यासाठी घातक ठरला. बाजारात या कंपनीचे प्रदर्शन अत्यंत कमकुवत राहिले. ही कंपनी स्पर्धेत टिकण्यासाठी अद्यापही संघर्ष करत आहे.
गेल्या फेब्रुवारीपासून कंपनीचे युजर्स वाढलेले नाही. कंपनीचा अहवाल निराशाजनक आहे. फेसबुकच्या (Facebook) मासिक वापरकर्त्यांची संख्या वाढणे तर दूरच पण कमी होत आहे. या कंपनीचा शेअरही गडगडला आहे. त्यामुळे झुकेरबर्गच्या चिंता वाढल्या आहेत.
या नव्या बदलाची नांदी झुकेरबर्गनेही ओळखली आहे. हा प्रकार वेळीच थांबला नाही तर या नव्या नामाकरण आणि प्रकल्पामुळे कंपनीचा मोठा निधी नाहक बरबाद होईल, असा दावा खुद्द झुकेरबर्गने कंपनीच्या बैठकीत केला आहे.