मुंबई- सध्या स्मार्टफोनचं युग असून प्रत्येकाच्या हाती आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन पाहायला मिळतात. पण स्वस्त आणि मस्त फोनच्या प्रतीक्षेत प्रत्येक जण असतो. अशाच एका स्मार्टफोनची गेल्या काही दिवसांपासून मोबाईलप्रेमी वाट पाहात होते. मोटोरोला नव्या दमाच्या फीचर्ससह आपला बजेट स्मार्टफोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. मोटोरोलाने नुकताच युरोपमध्ये एन्ट्रेली लेव्हल मोटो E13 स्मार्टफोन सादर केला होता. आता हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार असून अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 8 फेब्रुवारी 2023 रोजी लाँच करण्याची घोषणा केली आहे. लीकर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होईल. पण असं असलं तरी या स्मार्टफोनमध्ये काही खास आहे का? असा प्रश्नही काही मोबाईलप्रेमी विचारत आहे. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर मोबाईलच्या वैशिष्ट्यांबाबत जाणून घ्या.
भारतात हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच फ्लिपकार्टवर याची माहिती देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवरील टीझरनुसार हा स्मार्टफोन 2जीबी आणि 4जीबी रॅमसह उपलब्ध असेल. तर या स्मार्टफोनमध्ये 64जीबी स्टोरेजचा पर्याय असू शकतो. लीकर्सनुसार, मायक्रो एसडी कार्डमधून फोन स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवू शकता. इतर देशांमध्ये हा स्मार्टफोन फक्त 2जीबी रॅमसह उपलब्ध आहे. मोटो ई13 मध्ये Unisoc T606 चिपसेट असून दोन ARM Cortex A75 आणि सहा ARM Cortex A55 असे पर्याय असतील. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी असून 10 वॅट वायर चार्जरला सपोर्ट करेल. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन दोन सिमकार्डला सपोर्ट करेल. 5.0 ब्लूथूत वर्जन असून 3.5 मीमीचा हेडफोन जॅक आहे.
स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच आयपीएस एलसीडी एचडी प्लस स्क्रीन असेल.बजेट फोन असल्याने काही ना काही कमी मिळतंच. असंच काहीसं कॅमेऱ्याच्या बाबतीत म्हणावं लागेल. मोबाईलला मागच्या बाजूला 12 एमपीचा एकच कॅमेरा असण्याची शक्यात आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पुढे 5 एमपी कॅमेरा असेल. हा स्मार्टफोन ऑरोरा ग्रीन, कॉस्मिक ब्लॅक आणि क्रिमी व्हाईटमध्ये उपलब्ध असेल.
लीकर्सनुसार, या स्मार्टफोनची किंमत 7 हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. असं असलं तरी कंपनीने या हँडसेटची किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. हा स्मार्टफोन उद्या म्हणजेच 8 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. त्यामुळे कंपनी त्याची किंमत अधिकृतपणे जाहीर करेल.