नवी दिल्ली : इंधनाच्या किंमतीत होणारी वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने निती आयोगाने देशात इलेक्ट्रिक कारचा वापर वाढवण्यासाठी एक खास योजना तयार केली आहे. यामुळे तुम्ही 30 रुपयांमध्ये 22 किलोमीटरचा प्रवास करु शकणार आहे. विशेष म्हणजे या योजनेला प्रधानमंत्री कार्यालयातून मंजुरी मिळाली आहे. आयोगाच्या या योजनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या रजिस्ट्रेशन आणि रोड चार्जमध्ये सूट मिळणार आहे. तसेच आयोगाने राज्य सरकारला इलेक्ट्रिक वाहनांसाठी सूट उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.
30 रुपयामध्ये 22 किलोमीटरचा प्रवास
“निती आयोगाच्या योजनेनुसार तुम्ही 30 रुपयांमध्ये 22 किलोमीटरपर्यंत गाडी चालवू शकता. 30 रुपयांच्या टॉप अपसाठी तुम्हाला 15 मिनिटांची वेळ द्यावी लागणार. दिल्लीमध्ये सार्वजनिक पार्किंग स्पेस आणि इतर जागी फास्ट चार्जिंग स्टेशन लावणार आहे. कारण चार्जिंग स्टेशन वाढल्यावर इलेक्ट्रॉनिक कारची विक्री वाढेल. तसेच इलेक्ट्रॉनिक कारला फुल चार्ज करण्यासाठी 90 मिनिटं लागतील”, असं ईईएसएलचे एमडी सौरभ कुमार यांनी सांगितले.
मोबाईल अॅपने चार्जिंग करु शकता
दिल्लीमध्ये काही ठिकाणी मार्च 2019 पर्यंत 84 स्टेशन बनणार आहेत. यामध्ये खान मार्केट, जसवंत प्लेस आणि एनडीएमसीच्या इतर ठिकाणी 84 स्टेशन तयार करण्यात येणार आहेत. तसेच मोबाईल अॅपने चार्जिंग करु शकता. तसेच युजर आपला स्लॉटही निवडू शकतो.
कोणत्या कंपनीच्या गाड्यांचा समावेश
या चार्जिंग स्टेशनवर सुरुवातीला टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनींच्या गाड्यांचा समावेश असेल. इलेक्ट्रॉनिकच्या दोन चाकी किंवा तीन चाकी गाड्यांच्या चार्जिंगसाठी 15 व्हॅटच्या चार्जरचा वापर करावा लागेल. चार्जिंग स्टेशन भारत डीसी-0001 वर आधारित असतील.