मुंबई : ऑनलाईन शॉपिंगचा सध्या ट्रेंड आहे आणि त्यात सण-उत्सव असले म्हणजे हा ट्रेंड आणखी वाढतो. पण तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचे चाहते असाल तर तुम्हाला धक्का बसेल, अशी बाब समोर आली आहे. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, परफ्यूम, शूज यांसारख्या गोष्टी जास्त खरेदी केल्या जातात. पण यामधील पाचपैकी एक वस्तू फेक असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.
‘लोकल सर्कल्स’कडून एक अहवाल जारी करण्यात आला आहे. ज्यातून हे वास्तव समोर आलंय. ऑनलाईन वस्तू खरेदी करताना पाचमधील एक वस्तू ही फेक मिळते, असा दावा अहवालात करण्यात आलाय. म्हणजेच आतापर्यंत गेल्या सहा महिन्यात भारतीय युजर्सने ज्या वस्तू ऑनलाईन खरेदी केल्या, त्यातल्या 20 ते 22 टक्के वस्तू फेक निघाल्या आहेत. अशा फेक वस्तू विकणाऱ्यांच्या यादीत काही नामांकीत ई-कॉमर्स वेबसाईट्सचा समावेश आहे.
37 टक्के फेक वस्तू विकणाऱ्या यादीत सर्वात प्रथम क्रमांकावर स्नॅपडील आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर 22 टक्क्यांसह फ्लिपकार्ट आहे. 21 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर पेटीएम मॉल आणि 35 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर अमेझॉन आहे. तसेच यात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या फेक वस्तूंमध्ये परफ्यूम, डीओ, स्पोर्टसच्या वस्तू आणि बॅगचा समावेश आहे.
मोठ्या सेलचं आयोजन करण्यात येतं, तेव्हा फेक वस्तूंची विक्री जास्त होते. कारण, यावेळी वेबसाईटवर युजर्सची संख्या जास्त असते आणि ते एखाद्या वस्तूवरील डिस्काऊंट पाहून लगेच ती खरेदी करतात म्हणून अशावेळी प्रत्येक वस्तूंचा रिव्ह्यू पाहा आणि मगच खरेदी करा.