टेलिग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पावेल डुरोव यांना फ्रान्सच्या विमानतळावर अटक करण्यात आली होती. पॅरिसमध्ये चौकशीअंती त्यांना सोडून देण्यात आले. मूळचे रशियन असलेले अब्जाधीश पावेल यांना आता फ्रान्सच्या न्यायालयात खटल्याला तोंड द्यावे लागणार आहे. अर्थात तिथल्या कायद्यानुसार ते लागलीच गुन्हेगार आहेत, असा त्याचा अर्थ निघत नाही. त्यांच्यावर खटला चालवण्यात येईल असे नाही, पण न्यायाधीशांच्या मते चौकशी इतपत या प्रकरणात काहीतरी आहे. पॅरिस पोलिसांनी डुरोव यांना 96 तास ताब्यात ठेवले होते. फ्रान्सच्या कायद्यानुसार, त्यांना इतके तासच ताब्यात ठेवता येत होते.
फ्रान्स सोडण्यास मनाई
डुरोव यांना मुक्त करण्यात आले असले तरी त्यांना फ्रान्स सोडता येणार नाही, याच अटीवर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. पावेल डुरोव यांना 24 ऑगस्ट रोजी पॅरिस विमानतळावर अटक करण्यात आली होती. सध्या त्यांना आठवड्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. त्यांच्या टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर अंमली पदार्थांची तस्करी आणि बाल लैंगिक शोषण सामग्रीच्या वितरणासाठी करण्यात येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
100 मुलांचे वडील कसे?
मूळ रशियन असलेले पावेल हे सध्या 39 वर्षांचे आहेत. टेलिग्रामवर Pavel Durov यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. त्यानुसार, आपण 100 हून अधिक मुलांचे पिता असल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे पावेल यांचे लग्न झालेले नाही. सध्या जगभरातील 12 देशांमध्ये त्यांचे 100 हून अधिक बायोलॉजिकल मुलं असल्याचा दावा त्याने या पोस्टमध्ये केला आहे.
पॉवेलच्या मते हे मोठे जोखमीचे काम आहे. पण शुक्राणू दाता असण्याचा आपल्याला अभिमान असल्याचे ते म्हणाले. त्याचा मला कोणताही पश्चाताप नाही. सध्या जगभरात निरोगी आणि सक्षम शुक्राणू ही गरज आहे, त्यांची कमतरता, उणीव जगाला भासत आहे. त्यामुळे मी या कामात काही योगदान देऊ शकलो, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे तो म्हणाला होता.
2015 मध्ये आणले टेलिग्राम ॲप
पावेल डुरोव याने 2015 मध्ये टेलिग्राम ॲपची सुरुवात केली होती. त्याने रशिया कधीचाच सोडला आणि तो संयुक्त अरब अमिरातची (UAE) राजधानी दुबईत स्थायिक झाला आहे. तिथूनच कंपनीचे कामकाज चालते. त्याच्याकडे युएई आणि फ्रान्सचे नागरिकत्व आहे. पण रशियन सरकार त्याला अजूनही त्यांचा नागरिक मानते. पावेल याच्या दाव्यानुसार, टेलिग्रामवर महिन्याला 950 दशलक्ष सक्रिय युझर्स, वापरकर्ते आहेत. टेलेग्रामचा सर्वाधिक वापर युक्रेन आणि रशियात करण्यात येतो.