नवी दिल्ली | 26 नोव्हेंबर 2023 : मोबाईलमधील सिम कार्डविषयी तर तुम्हाला माहिती आहेच. दूरसंचार कंपन्यांचे आऊटलेट, चौकातील मोबाईल दुकानातून तुम्ही सिमकार्ड खरेदी केले असेल. पण ही eSIM काय भानगड आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ई-सिम आणि फिजिकल सिममध्ये काही तरी फरक असेल. पण कोणते सिम वापरामुळे फायदा होईल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही युझर्स ई-सिमचा वापर करत आहे. पण त्यांना त्याविषयीची फारशी माहिती नाही. तर जाणून घेऊयात ई-सिम आणि मोबाईल सिमविषयी…
काय आहे ई-सिम
eSIM चा अर्थ आहे एम्बेडेड सब्सक्राईबर आयडेंटिटी मॉड्यूल. हे एक डिजिटल सिम आहे. ते डिव्हाईस, मोबाईलमध्ये एम्बेड करता येते. सोप्या शब्दात सांगायचे तर हे सिम फिजिकली मोबाईलमध्ये बसविण्याची गरज नाही. फिजिकल सिमच्या तुलनेत ई-सिम जास्त सुरक्षित असते. हे सिम कार्ड हरविण्याची अथवा चोरी होण्याची शक्यता फार कमी असते.
असा होतो फायदा
ई-सिमच्या वापरामुळे सिम कार्ड हरवण्याचे, चोरी होण्याची भीती संपते. मोबाईल चोरीनंतर चोरटे त्यातील सिम कार्ड फेकून देतात आणि चोरीचा मोबाईल काही तासातच देशातील दुसऱ्या शहरात विक्री होतो.ई-सिममुळे या फोनचे लोकेशन कळते, तो ट्रॅक करणे सोपे होते. फिजिकल सिमचा एक मोठा फायदा म्हणजे ते कोणत्याही मोबाईलच्या खोबणी बसते. बाजारात अजून ई-सिम कार्डला सपोर्ट करणारे डिव्हाईस कमी आहेत. फिजिकल सिम खराब होण्याचे, हरविण्याचे प्रमाण अधिक असते. जेव्हा बाजारात ई-सिम डिव्हाईस येतील, तेव्हा त्याचा अधिक वापर होईल.
ई-सिम अनेक डिव्हाईशी जोडा
ई-सिम सेवेमुळे सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे अनेक डिव्हाईसशी तुम्हाला एकाचवेळी एकाच क्रमांकावरुन जोडणी करता येईल. मोबाईल फोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत सर्व डिव्हाईस इंटरकनेक्ट करता येतील. जर तुम्ही ई-सिमचा वापर करु इच्छित असाल तर सर्वात अगोदर फोनमध्ये तशी व्यवस्था आणि त्याची तशी क्षमता आहे का हे तपासा. जर तुमचा फोन ई-सिमला सपोर्ट करत असेल तर टेलिकॉम ऑपरेटरशी संपर्क करावा लागेल.