मुंबई : तुम्हाला तुमचं फेसबुक अकाऊंट एका वर्षासाठी डिअॅक्टीव्हेट करण्यासाठी जवळपास 70 हजार रुपये खर्च करावे लागू शकतात, हे आम्ही नाही तर एका अभ्यासात समोर आलं आहे. फेसबुकच्या बाजार मूल्याच्या तुलनेत युझर्ससाठी फेसबुकचे काय मूल्य आहे याचं विश्लेषण करण्यासाठी हा रिसर्च घेण्यात आला होता. अमेरिकेतील टफट्स विद्यापीठातील संशोधकांनी हा रिसर्च केला. यामध्ये लिलावांची एक अशी मालिका सुरु करण्यात आली ज्यात लोकांना कमीतकमी एक दिवस ते जास्तीत जास्त एका वर्षापर्यंत आपलं फेसबुक अकाऊंट डिअॅक्टीव्हेट करण्यासाठी बोली लावायची होती.
या रिसर्चमध्ये संशोधकांच्या असं लक्षात आलं की, फेसबुक युझरला एका वर्षासाठी त्याचं अकाऊंट डिअॅक्टीव्हेट करण्यासाठी जवळपास 70 हजार रुपये खर्च करावे लागू शकतात. फेसबुकचे जगभरात दोन अब्जाहून जास्त युझर्स आहेत. फेसबुक त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, जे वापरायला युझरला कुठल्याही प्रकारचे शुल्क मोजावे लागत नाही.
संशोधकांनी तीन प्रकारचे लिलाव घेतले, यात कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, समाज आणि ऑनलाईन लिलाव झाला. यामध्ये फेसबुकचे अकाऊंट एका वर्षाकरिता बंद ठेवण्यासाठी 70 हजारांची बोली लागली. यावरुन हे निश्चितच कळून येते की आपल्यासाठी फेसबुक किती महत्त्वाचं आहे.
“सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. आपल्या मित्रांच्या आणि कुटुंबियांच्या संपर्कात राहाण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. पण इंटरनेटमुळे आपण श्रीमंत किंवा अधिक कार्यक्षम झाल्याचा कुठलाही पुरावा नाही”, असे अमेरिकेच्या केन्यॉन कॉलेजचे प्राध्यापक जे कॉर्रिगॅन यांचे म्हणणे आहे.
“लोकांसाठी फेसबुक अत्यंत मूल्यवान आहे, नाहीतर त्यांनी आपला मूल्यवान वेळ यावर खर्च केला नसता. पण ज्या सेवेवर लोक काहीही खर्च करत नाहीत, त्याचे मूल्य ठरवणे हे एक आव्हान होते”, असेही कॉर्रिगॅन यांनी सांगितले.
फेसबुक हा जगातील सर्वात जास्त वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगभरात फेसबुकचे दोन अब्जाहून अधिक युझर्स आहेत, त्यातही भारतातील फेसबुक युझर्सची संख्या जास्त आहे. लोक आपल्या दिवसाचे अनेक तास आज फेसबुकवर घालवतात आणि हा इतक्या मोठ्या प्रमाणात फेसबुकचा वापर करण्यासाठी आपल्याला फेसबुकला कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. कदाचित यामुळेच फेसबुकचा इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर होतो आहे.