तर त्याला जणू कोणतीच बंधने नको आहेत. तो मुळातच व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता. पण त्याच्या या भूमिकेचा दहशतवादी, लहान मुलांचे शोषण करणारे, वाईट कामांसाठी निधी जमा करणाऱ्यांनी फायदा उठवला. त्याचे टेलिग्राम हे जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सोशल मीडियाच्या जगात युझर्सच्या संख्येनुसार ते सहाव्या क्रमांकावर आहे. रशियातील या तरुणाने इंटरनेटचा देव होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि सत्यात उतरवले. मॅसेजिंगच्या विश्वात मोठा चमत्कार केला. जगभरातील विद्यार्थ्यांचा गळ्यातील ताईत असलेले टेलिग्राम प्रत्यक्षात आणले. पॉवेल डुरोव नाम तो सुनाही होगा.
जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तहेर संघटना मोसाद त्याच्या मागावर आहे. इतर देशांचा पण त्याच्यावर दबाव आहे. फ्रान्स सरकारने त्याला या 24 ऑगस्ट रोजी पॅरिसजवळ त्याच्या खासगी जेटने उतरताच अटक केली. त्याच्यावर संशय घेण्याइतपत चौकशीची आवश्यकता फ्रेंच न्यायालयाने व्यक्त केली. एकूणच टेलिग्रामचा सीईओ, मालक पॉवेल डुरोव याचे ग्रह फिरले आहेत, हे नक्की. अर्थात मॅसेजिंग जगतातील या बेताज बादशाहला या घडामोडींची कल्पना नव्हती असे नाही. पण तो निडर, बेडर आणि करारी बाण्याचा तितकाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. त्यासाठीची किंमत मोजायला जणू तो जीवावर उदार झाला आहे. वरवर अगदी साधं-सोप्या वाटणाऱ्या या स्टोरीत एका विषकन्येची एंट्री झाली नी माध्यमांचे लक्ष वेधले गेले.
ती पॉवेलसाठी विषकन्या ठरल्याची चर्चा रंगली. जुन्या काळात गुप्तहेर महिलांना विषकन्या म्हटलं जायचं. त्या आपल्या सौंदर्याने सावजाला जाळ्यात अडकायच्या आणि शत्रू राष्ट्राच्या हाती द्यायच्या अथवा त्याच्या खात्मा करायच्या, अशा अनेक चुरस कथा आहे. त्यात ही आधुनिक कथा जोडल्या गेली आहे. पावेल आणि युलिया या दोघांची भेट होऊन फार काळ लोटला नसल्याचे समोर येत आहे. याच वर्षात या दोघांची भेट झाली. कझाकस्तान, किर्गिस्तान, अझरबैजान या देशात दोघे फिरताना दिसले. तिचे आणि पॉवेलचे एकाच स्थानावरील छायाचित्र, व्हिडिओज समाज माध्यमांवर दिसून येतात. त्यावरील दोघांच्या अनेक स्टोरीज. छायाचित्र सुद्धा सारखेच आहेत.
पॅरीस येथे पोहचण्यापूर्वी या दोघांनी अझरबैजान या देशातील बाकू येथे सोबत नाश्ता केला होता. ते दोघे एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करताना दिसत आहेत. त्यानंतर युलिया आणि पॉवेल एका व्हिडिओत एकत्र दिसत आहेत. हा व्हिडिओ युलियाने शूट केलेला आहे. एका दाव्यानुसार तिने हे व्हिडिओ आणि छायाचित्र मुद्दाम सोशल मीडियावर टाकले. त्यामुळे फ्रान्स आणि मोसाद या संघटनेला त्यांच्या प्रत्येक ठिकाणाची माहिती मिळत होती. ते जसे पॅरीस विमानतळावर खासगी जेटने उतरले तेव्हाच त्यांना फ्रेंच पोलिसांनी स्थानबद्ध केले.
पॉवेलने असे तयार केले साम्राज्य
पॉवेल डुरोव याचा 1984 मध्ये तत्कालीन सोव्हिएट यूनियन, रशियात जन्म झाला. आई-वडील बुद्धिवादी होते. भावासोबत तो सेंट पीटर्सबर्ग या नावाजलेल्या विद्यालयात शिकला. त्याच दरम्यान त्याचे आई-वडिल इटलीला स्थायिक झाले. पण दोन्ही भाऊ रशियातच शिकत होते. त्याचा मोठा भाऊ निकोलाई याचा त्याचावर मोठा प्रभाव आहे. निकोलाई हा गणितातील चॅम्प आहे. त्याने आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये 90 च्या दशकात सलग तीनदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तर या भावाची मोठी छाप पॉवेलवर पडली.
शाळेत शिकताना अचाट असं काही करायचं, असं पावेल याने मनाशी पक्क केलं होतं. त्याचवेळी शाळेत त्याला संगणकीय तंत्रज्ञानात मोठी गती होती. पावेल कुठे दिसला नाही की तो हमखास शाळेच्या कम्प्युटर लॅब सापडणार हे त्याच्या मित्र-मैत्रिणींना माहिती होते. ज्या वयात मुलं इतर उद्योग करत त्यावेळी या पठ्ठ्याने त्याच्या विद्यालयातील सर्व संगणक प्रक्रियचा हॅक केली. त्याच्या शाळेतील प्रत्येक संगणकावर Must die असा संदेश असलेली स्क्रीन दिसू लागली. अखेरीस हा आपला पराक्रम असल्याचे त्याने जाहीर केले. इतकचं काय आपण इंटरनेटचा प्रेषित होणार असल्याचे त्याने एकदा शाळेत जाहीर केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पण हे निराळंच पाणी असल्याची कल्पना त्याच्या शिक्षकांना आली होती.
त्यानंतर त्याने भावाच्या मदतीने 2013 मध्ये टेलिग्राम सुरु केले. तो संयुक्त अरब अमिरातच्या दुबईत स्थायिक झाला. तिथेच त्याने टेलिग्रामचे कार्यालय सुरु केले. पण त्याच्या कार्यालयात 30 पेक्षा जास्त कर्मचारी नाहीत. त्यातील 90 टक्के कर्मचारी विविध देशात फिरतात. ते एका ठिकाणी थांबत नाहीत. टेलिग्राममध्ये एचआर विभाग नसल्याचे सांगण्यात येते. सर्व काही पावेलच हाताळतो. विविध देशांचा सतत ससेमिरा असल्याने तो फिरत असतो. त्याच्याकडे फ्रान्स, युएई, सेंट किट्स, नेविस या देशासह रशियाचे नागरिकत्व आहे. त्याच्यावर फ्रान्स सरकारने गंभीर आरोप लावलेले आहेत. त्याला आता फ्रान्स सोडून जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.