नवी दिल्ली : भारतातील स्मार्टफोन कंपन्यांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर घेऊन येत आहे. नव्याने लाँच होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये फिचर्स, मेमरी, स्टोअरेज, कॅमेरा यातील विविध पर्यायामुळे स्मार्टफोन आणखी स्मार्ट होतायत. सध्या बाजारात नवीन लाँच होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरा किंवा रिअर कॅमेरा किती मेगापिक्सलाचा आहे? याबाबत सर्वाधिक चर्चा होते. हेच लक्षात घेऊन सॅमसंगद्वारे 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे.
सॅमसंग या नामांकित स्मार्टफोन कंपनीद्वारे अवघ्या काही दिवसांपूर्वी गॅलेक्सी A सीरिजचा A-70 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता सॅमसंग कंपनीने नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कमी उजेडात या कॅमेराद्वारे ऑटोमेटिक पद्धतीने 16 मेगापिक्सलपर्यंत फोटो घेता येणार आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 64 मेगापिक्सल ISOCELL Bright GW1 सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात 100dB पर्यंत रिअलटाईम आणि HDR सपोर्टही देण्यात येणार आहे.
आतापर्यंत सोनी कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. सोनी कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये टक्कर म्हणून सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात येणार आहे.
सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल कन्व्हर्जन सेन्सर देण्यात येणार आहे. या सेन्सरमुळे फोटो क्लिअर येतील. तसेच फोटो काढताना होणार आवाजही येणार नाही. त्याशिवाय या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यात हाय परफोर्मन्स फेस डिटेक्शन, ऑटोफोकस टेक्नोलॉजी, फुल एचड़ी सपोर्ट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजेच या कॅमेऱ्यातील सेन्सरद्वारे 480 फ्रेम प्रति सेकंद वेगात स्लो मोशन व्हिडीओ काढता येतील. सॅमसंगच्या कोणत्या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार? या फोनची किंमत किती असणार? याबाबत मात्र कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
गेल्या काही वर्षांपासून बाजारातील स्मार्टफोन कंपनी मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात विविध फिचर देत आहेत. त्यामुळे सँमसँग कंपनीद्वारे अॅडवान्स पिक्सल टेक्नोलॉजीचा वापर करत ISOCELL Bright GW1 आणि GM2 नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच केले जाणार आहे. दरम्यान सॅमसंग या नव्या टेक्नोलॉजीचा वापर गॅलेक्सी एस सीरीज किंवा गॅलेक्सी नोट सीरीजमध्ये करु शकते असा अंदाज सॅमसंग इलेक्ट्रॉनिकचे बिजनेस वाईस प्रेसिडेंट यॉन्गिन पार्क यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या :