मुंबई, शाहरुख खानचा सुपरहिट चित्रपट पठाण बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई करत आहे. चित्रपटाची कमाईही बऱ्यापैकी होत आहे. मात्र, आपण चित्रपटाबद्दल नाही तर त्यात दाखवलेल्या सॅटेलाइट फोनबद्दल (Satellite Phone in India) बोलणार आहोत. जर तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर सुरुवातीच्या दृश्यात तुम्ही सॅटेलाइट फोन पाहिला असेल. हा फोन तुम्ही याआधी इतर चित्रपटांमध्येही पाहिला असेल. हा सॅटेलाइट फोन काय आहे आणि सिम-नेटवर्कशिवाय तो कसा काम करतो, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण सॅटेलाइट फोनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
नावाप्रमाणेच या फोनचा मोबाईल नेटवर्कशी काहीही संबंध नाही. अंतराळात असलेल्या उपग्रहावरूनच त्याला सिग्नल मिळतो. तुम्हाला उपग्रहांबद्दल माहिती असेल की ते पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहेत आणि जमिनीवर रिसीव्हरला रेडिओ सिग्नल पाठवत आहेत.
हा सिग्नल फक्त सॅटेलाइट फोनमध्ये वापरला जातो. सॅटेलाइट फोनचा सिग्नल आधी सॅटेलाइटकडे जातो, त्यानंतर सॅटेलाइटच्या मदतीने रिसिव्हरला सिग्नल पाठवला जातो. जंगले, टेकड्या आणि दुर्गम भागात याचा वापर केला जातो.
सामान्य व्यक्ती ते वापरू शकत नाहीत. सुरक्षेच्या कारणास्तव, भारतात सामान्य लोकांच्या सॅटेलाइट फोनच्या वापरावर बंदी आहे. विशीष्ट परिस्थितीत त्याचा वापर करण्यासाठी, तुम्हाला सरकारची परवानगी घ्यावी लागेल.
बीएसएनएल देशात सॅटेलाइट फोन सेवाही पुरवते. पोलिस, आर्मी, रेल्वे, बीएसएफ आणि इतर सरकारी यंत्रणा गरजेच्या वेळी त्याचा वापर करतात. हे आपत्ती व्यवस्थापन हाताळणाऱ्या एजन्सीद्वारे देखील वापरले जाऊ शकते.
सॅटेलाइट फोनची किंमत सुमारे 1500 ते 2000 डॉलर्स आहे. भारतात त्याची किंमत 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचे कॉल दर सामान्य फोन कॉल्सपेक्षा खूप महाग आहेत.
प्रतिबंधित सॅटेलाइट फोन वापरल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी 38 वर्षीय रशियन महिला पर्यटकाला अटक केली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण गोव्यातील रशियन महिला अलेक्सी कामिनिनकडून ‘थुर्या’ नावाचा सॅटेलाइट फोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आला होता. भारतात सॅटेलाइट फोन ठेवण्यास आणि वापरण्यास मनाई आहे. भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा आणि भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या कलम 20 अंतर्गत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.