नवी दिल्ली | 19 ऑक्टोबर 2023 : ॲप्पल कंपनी भारतात स्मार्टफोन तयार करेल, असे अनेकांना अजूनही विश्वास बसत नाही. iPhone 15 मुळे तंत्रज्ञान जगतातच नाही तर सर्वच क्षेत्रात भारताची मान उंचावली आहे. अनेक दिग्गज कंपन्यांना केवळ बाजारपेठच नाही तर उत्पादनासाठी भारत महत्वाचा वाटत आहे. त्यामुळेच ॲप्पलनंतर इतर कंपन्यांनी भारताकडे मोर्चा वळवला आहे. त्यांच्या उत्पादनावर मेड इन इंडियाची मोहोर त्यांना उमटवून हवी आहे. ॲप्पल नंतर जगातील ही अव्वल कंपनी भारतात स्मार्टफोन तयार करणार आहे. पुढील वर्षात 2024 मध्ये कंपनीचा स्मार्टफोन भारतात तयार होऊन जगाच्या बाजारपेठेत असेल.
गुगलने केली तयारी
जगातील मोठी टेक कंपनी गुगलने त्यांचा स्मार्टफोन भारतात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची माहिती गुगलचे मूळ भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली. सोशल मीडियावर त्यांनी या निर्णयाची घोषणा केली. पुढील वर्षात 2024 च्या सुरुवातीलाच हा स्मार्टफोन बाजारात येईल. किती असेल या फोनची किंमत?
स्पर्धा वाढणार
गुगल भारतात आल्यावर स्मार्टफोन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा असेल. ॲप्पल, गुगल, सॅमसंग आणि इतर ब्रँडमध्ये चुरस असेल. त्याचा फायदा ग्राहकांना होईल. गुगल भारतात उत्पादन सुरु करणार असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अनेक तंत्रज्ञ, कुशल मनुष्यबळाला मोठ्या संध्या उपलब्ध होतील.
काय असेल किंमत
Google Pixel या स्मार्टफोनची किंमत किती असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याची माहिती सुंदर पिचाई यांनी अथवा गुगलने दिलेली नाही. ॲप्पल सध्या भारतात त्यांचा स्मार्टफोन असेंम्बल करत आहे. पण त्यामुळे भारतीय बाजारपेठेतील किंमतीत कोणताही मोठा फरक दिसलेला नाही. ॲप्पल अजूनही इतर पार्ट्स आयात करत असल्याचे त्याचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. गुगल पिक्सल असेंम्बल होणार की तयार होणार हे अजून समोर आलेले नाही. त्याआधारे गुगल पिक्सलची किंमत ठरेल.
ॲप्पलला देईल टक्कर
ॲप्पल आणि गुगलमध्ये पुढील वर्षात 2024 मध्ये जोरदार चुरस दिसेल. दोन्ही ब्रँड भारतीय बाजारपेठेतील आणि आशियातील हिस्सा वाढविण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे दोघांना एकमेकांचेच नाही तर प्रतिस्पर्ध्यांचे पण आव्हान असेल. गुगल भारतात येत असल्याने इतर अनेक जागतिक ब्रँड भारतात येतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. या कंपन्यांना केंद्र सरकार खास सवलती आणि विशेष सेवा देत आहे. टेस्ला पण भारतात उत्पादन सुरु करण्यासाठी घाई करत आहे.