नवी दिल्ली : सध्या तरुणाईमध्ये ‘टिक टॉक’ TikTok app या व्हिडीओ अॅपची मोठी क्रेझ आहे. या अॅपच्या माध्यमातून गेल्या कित्येक दिवसांपासून अश्लील व्हिडीओ समोर येत होते. या कारणामुळे मद्रास हायकोर्टाने टिक टॉक अॅपवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र मद्रास हायकोर्टाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात काही युजर्सने सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून ‘टिक टॉक’ या म्युझिकल व्हिडीओ अॅपने तरुणांना अक्षरश: वेड लावले आहे. या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण कित्येकदा ‘टिक टॉक’द्वारे अश्लील व्हिडीओही तयार करण्यात येतात. त्यामुळे ‘टिक टॉक’वर बंदी घालावी, अशा प्रकारची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान ‘टिक टॉक’ अॅपच्या डाऊनलोडिंगवर बंदी घालावी असे आदेश हायकोर्टाने केंद्र सरकारला दिले होते. तसंच सर्व प्रसारमाध्यमांनीही टिक टॉकवर तयार करण्यात येणार व्हिडीओ प्रदर्शित करणे टाळावे, असेही हायकोर्टाने म्हटलं होतं.
An appeal has been filed in the Supreme Court against Madras High Court order banning TikTok app. Supreme Court says, “it will look into it.” pic.twitter.com/a8qdwJF1gx
— ANI (@ANI) April 8, 2019
मद्रास हायकोर्टाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली आहे. तसेच यावर सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर सुनावणी करावी असेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. पण सुप्रीम कोर्टाने या निर्णयाविरोधात लवकर सुनावणी करण्यास विरोध केला आहे. या अॅपबाबत सर्व माहिती घेतल्यानंतरच सुप्रीम कोर्ट यावर सुनावणी करेल असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे सुप्रीम कोर्ट टिक टॉक अॅपबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या महिन्यात ‘टिक टॉक’ या अॅपमुळे तमिळ संस्कृतीचे पालन होत नसल्याचे तमिळनाडू सरकारने सांगितले होते. या अॅपमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे. ज्याप्रमाणे ‘ब्ल्यू व्हेल’ या गेमिंग अॅपवर बंदी घालण्यात आली होती, तशाचप्रकारे या अॅपवरही बंदी घालावी अशी मागणी तमिळनाडू सरकारने केंद्र सरकारला केली होती.
तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘टिक टॉक’वर हायकोर्टाकडून बंदी
‘टिक टॉक’ हे चीनमध्ये तयार करण्यात आलेले अॅप आहे. चीनमध्ये हे अॅप ‘डॉयइन’ नावाने प्रसिद्ध आहे. सप्टेंबर 2016 साली चीनने ‘डॉयइन’ या अॅपला चीनच्या ऑनलाईन मार्केटमध्ये लाँच केलं होत. त्यानंतर वर्षभरात ‘टिक टॉक’ या नावाने हे अॅप जगभरात लाँच झाले. 73 एमबीचे हे अॅप असून याचे 500 मिलियन अर्थात 50 कोटीपेक्षा जास्त युजर्स आहेत.
पाहा व्हिडीओ :