मुंबई : नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या आहेत. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, WhatsApp च्या या नवीन धोरणामुळे अनेकजण WhatsApp वर आणि कंपनीच्या नवीन धोरणांवर टीका करत आहे. अनेकांनी तर WhatsApp ऐवजी Signal आणि Telegram सारख्या इतर मेसेजिंग अॅप्सवर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान तिन्ही अॅप कंपन्या त्यांचंच अॅप कसं बेस्ट आणि अधिक सुरक्षित आहे, याचा प्रचार करत आहेत. तर इतर अॅप्स कसे आणि कुठे कमी पडतात याबाबतही मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करत आहेत, अशा परिस्थितीत युजर्समध्ये गोंधळाचे वातावरण आहे. (Telegram, WhatsApp or Signal, Which is best and safest app?)
युजर्सच्या संख्येचा विचार केला तर WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप आहे. सध्या WhatsApp चे 2 बिलियन (200 कोटी)/ प्रति महिना अॅक्टिव्ह युजर्स आहेत. तर टेलिग्राम हे जगात सर्वाधिक वापरलं जाणारं दुसऱ्या क्रमांकाचं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. टेलिग्रामचे 400 मिलियन (40 कोटी)/ प्रति महिना अॅक्टिव्ह युजर्स आहेत. तर या यादीत सिग्नल अॅप तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु WhatsApp ने त्यांची नवी पॉलिसी सादर केल्यापासून अनेक युजर्स आता टेलिग्राम आणि सिग्नल अॅपकडे वळू लागले आहेत. त्यातही प्रामुख्याने सिग्नल अॅपची सध्या जोरदार चर्चा आहे.
WhatsApp मध्ये युजर्सची मागणी असलेलं प्रत्येक लहान-मोठं फिचर आहे. मग ते पर्सनल अथवा ग्रुप चॅट असो किंवा व्हिडीओ/ऑडियो कॉल असेल. WhatsApp मध्ये युजर्सच्या सोयीचं प्रत्येक फिचर देण्यात आलं आहे. WhatsApp तुम्हाला इन्स्टाग्रामप्रमाणे स्टोरी अपलोड करण्याचं फिचर देतं. यात काही मर्यादादेखली आहेत, जसे की एका ग्रुपमध्ये केवळ 256 लोकांनाच सहभागी होता येतं. व्हिडीओ किंवा ऑडियो कॉलमध्ये एकावेळी केवळ 8 च जणांना सहभागी होता येतं. WhatsApp वर सर्व प्रकारच्या फाईल्स शेअर करता येतात, परंतु त्यावर साईज लिमिट आहे. फोटो, व्हिडीओ आणि ऑडियो फाईल्ससाठी ही मर्यादा 16MB पर्यंत आहे. डॉक्युमेंट्सच्या बाबतीत ही मर्यादा 100MB पर्यंत आहे. परंतु युजर्स सध्या WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे कंपनीवर नाराज आहेत.
Telegram App
Telegram App त्यांच्या युजर्सना अनेक फिचर्स देतं. Telegram वर तुम्हाला WhatsApp प्रमाणे चॅटिंग, ग्रुप चॅट आणि चॅनेलसारखे महत्त्वाचे फिचर्स दिले जातात. तसेच इतरही अनेक फिचर्स दिले जातात. टेलिग्रामवरील ग्रुप्समध्ये, चॅनेल्समध्ये 2 लाख युजर्स सहभागी होऊ शकतात. WhatsApp मध्ये ही मर्यादा 256 इतकी आहे. टेलिग्रामवरील ग्रुप्समध्ये तुम्ही बॉट, पोल, क्विज, हॅशटॅगसह अनेक इंस्ट्रूमेंट्सचा वापर करु शकता. त्यामुळे तुमचं चॅटिंग अधिकच इंटरेस्टिंग होईल. टेलिग्राम तुम्हाला Self Destructing Messages ची सुविधा देतं. टेलिग्रामवर तुम्ही 1.5 जीबीपर्यंतच्या फाईल्स शेअर करु शकता. या अॅपमध्ये अँड्रॉयड (Android) आणि आयओएस डिव्हाईसवर (iOS devices) व्हाईस आणि व्हिडीओ कॉल (video call) हे दोन्ही फिचर्स आहेत. तसेच हे अॅप पूर्णपणे सुरक्षित आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे अॅप एंड टू एंड एनक्रिप्टेड आहे. या अॅपमध्ये तुम्हाला सिक्रेट चॅटचा पर्यायही देण्यात आला आहे. यापैकी कोणतंही फिचर WhatsApp मध्ये देण्यात आलेलं नाही.
Signal App
Signal App त्यांच्या युजर्सना सुरक्षित मेसेज, ऑडियो आणि व्हिडीओ कॉलसारखे फिचर्स देतं. या अॅपवरील सर्व प्रकारचे संवाद हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड (end-to-end encrypted) असतात. या अॅपमध्येदेखील ग्रुप्सचा पर्याय आहे. परंतु या अॅपवर एकच मेसेज खूप लोकांना पाठवता येत नाही. या अॅपने नुकतंच ग्रुप कॉलिंग हे फिचर लाँच केलं आहे. सिग्नल अॅपमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण फिचर देण्यात आलं आहे, ते म्हणजे नोट-टू-सेल्फ (Note to Self). या फिचरद्वारे तुम्ही स्वतःला मेसेज पाठवू शकता. स्वतःचा एक वेगळा ग्रुप बनवू शकता.
डाऊलोडिंगमध्ये सिग्नल पहिल्या स्थानी
प्रायव्हसी पॉलिसी बदलल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअॅपला चांगलाच फटका बसला आहे. प्रायव्हसीच्या नव्या फंद्यामुळे युझर्सनी सिग्नल मेसेजिंग अॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. या क्रॉस-प्लॅटफॉर्म एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिस सिग्नल अॅपने डाऊनलोडिंगच्या बाबतीत तसेच नवे युजर्स मिळवण्याच्या बाबतीत भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. शनिवारी सिग्नलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत भारतात व्हॉट्सअॅपला मागे सारत सिग्लनने पहिलं स्थान मिळावल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. फक्त भारतातच नाही तर जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँगकाँग, स्वित्झर्लंडमध्येही सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अॅप्समध्ये हे अॅप अव्वल स्थानावर आहे.
सिग्नलची व्हॉट्सअॅपवर मात
रॉयटर्सने त्यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, सेन्सर टॉवर डेटाचा हवाला देत गेल्या दोन दिवसांमध्ये सिग्नल अॅप अँड्रॉयड आणि आयओएस डिव्हाइसवर एक लाखाहून अधिक लोकांनी डाउनलोड केलं आहे. इतकंच नाही तर, 2021 च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपच्या नवीन यूजर्समध्ये 11 टक्क्यांनी घट झाली असल्याचंही समोर आलं आहे.
एलोन मस्कच्या ट्विटनंतर सिग्नल अॅपची लोकप्रियता वाढली
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी व्हॉट्सअॅपच्या नव्या घोषणेनंतर सांगितलं की, सिग्नल अॅप हा सुरक्षित असल्यानं त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो. ते स्वतःदेखील हेच अॅप वापरत असल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. मस्क यांच्या ट्वीटमुळे ते स्वतः हे अॅप वापरत असल्याच्या बातमीमुळे सिग्नल अॅपची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सिग्नल अॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केलं जात आहे.
संबंधित बातम्या
सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी
टेलिग्रामवर मात करण्यासाठी फेसबुककडून खोटा अपप्रचार, मार्केटिंगवर 73 हजार कोटींचा खर्च केल्याचा दावा
WhatsApp ऐवजी Telegram निवडणाऱ्या युजर्ससाठी वाईट बातमी, अॅप सुरक्षित नसल्याचा दावा
तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल
(Telegram, WhatsApp or Signal, Which is best and safest app?)