मुंबई : प्रत्येकाकडे स्मार्टफोन असणे ही चैनीची बाब नसून काळाची गरज बनत चालली आहे. पण या स्मार्टफोनचा वापर गरजेपुरताच होतो असे नाही, अनेकदा आपण ऑफिसमधून घरी जाताना, बाजारात खरेदी करताना, अगदी रस्ता ओलांडतानाही हातातला फोन न्याहळत असतो. काही जण तर चहा पिताना किंवा जेवतानाही सतत फोनवर असतात. विशेष म्हणजे दिवसभर आपण कितीही दमलो असू तरीही आपण दर दोन मिनीटाला फोन चेक करायला विसरत नाही. स्मार्टफोनने आपले आयुष्य सोपे केलं असले, तरी आपल्यातील अनेकांना स्मार्टफोनचे व्यसन जडले आहे. याच व्यसनापासून दूर जाण्यासाठी अनेक जण सातत्याने प्रयत्न करत असतात. मात्र काही खास टिप्स वापरुन तुम्ही नक्की तुम्हाला जडलेले मोबाईलचे व्यसन सोडवू शकता.
एम्स रुग्णालयाने केलेल्या एका अभ्यासानुसार, जवळपास 14 टक्के लोकांना मोबाईलचे व्यसन जडले आहे. या सर्व लोकांना तात्काळ उपचाराची गरज होती. मोबाईल व्यसन जडणाऱ्या लोकांमध्ये कमीतकमी 3 ते जास्तीत जास्त 6 लक्षणं अतिवापराची दिसणं गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीमध्ये मोबाईलच्या अतिवापराची 3 लक्षण आढळली, तर त्याला मोबाईलचे व्यसन जडले असे डॉक्टरांचे मत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अभ्यासानुसार जवळपास 19 टक्के लोक इच्छा असूनही मोबाईलच्या व्यसनापासून दूर जाऊ शकत नाही.
तसेच 24.8 टक्के लोक त्यांच्याकडे मोबाईल नसल्यावर त्यांना काहीतरी चुकल्यासारखे वाटते. तर 21.4 टक्के लोकांना मोबाईलचे अक्षरश: वेड लागल्याचे सांगितले. विशेष म्हणजे 19.4 टक्के लोक इच्छा असूनही मोबाईलपासून दूर जाण्याची इच्छा असूनही त्यांना दूर जाता येत नाही. तर 19.7 लोकांनी याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी तात्काळ त्यांना स्मार्टफोनचे व्यसन इतके व्यसन जडले आहे की त्यांनी इतर कोणत्याही गोष्टीचा मोह होत नाही. इतकंच नव्हे तर जवळपास 13 टक्के लोक मोबाईलच्या वापरामुळे कौटुंबिक नात्यांकडे दुर्लक्ष करतात.
‘या’ कारणामुळे जडते मोबाईलचे व्यसन
मोबाईलचे व्यसन जडण्याच्या फार गोष्टी आहेत. याआधी जेव्हा स्मार्टफोन आणि इंटरनेट अस्तित्वात नव्हते, तेव्हा सर्वसामान्य लोक व्यस्त राहण्यासाठी मैदानी खेळ खेळायचे किंवा गॉसिपिंग करायचे. या व्यतिरिक्त काही जण वाचन करणे, लेख लिहिणे, रंगरंगोटी करणे, गाणी गाणे, नृत्य करणे, वृक्षारोपण करणे यांसारखे छंद जोपासण्यास वेळ द्यायचे. यामुळे त्यांचा मेंदू कोणत्या ना कोणत्या कामात सतत व्यस्त राहायचा. मात्र आता स्मार्टफोनच्या युगात आपण सतत व्हॉट्सअप किंवा इतर मॅसिजिंग अपवर चॅटिंग करण्यात आपला वेळ घालवतो. तसेच अनेकदा व्हिडीओ किंवा फोटो स्क्रोल करत सतत पाहत असतो. यामुळे आपल्याला त्याची सवय लागते आणि नकळत आपल्याला मोबाईलचे व्यसन जडते.
स्मार्टफोन व्यसनापासून बाहेर पडण्यासाठी काही खास टिप्स
सर्वात प्रथम स्वत:वर संयम ठेवायला शिका. स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून स्वत:ला थोडे दूर ठेवण्याचा प्रयत्न करा
तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत घालवा. यामुळे तुम्ही काही काळ मोबाईलपासून दूर राहाल.
गरज पडल्यास फोनचा वापर करा. अन्यथा फोनचा वापर शक्य तितका टाळा
दिवसभर ऑनलाईन राहण्यापेक्षा कामापुरती गरज असतानाच ऑनलाईन रहा
स्वत:ला रिलॅक्स ठेवण्यासाठी काही काळ वॉकला जा किंवा तुम्ही ज्या गोष्टीत रमता ती गोष्ट करा