मुंबई : फेसबुक आणि व्हॉट्सअॅपनंतर आता ट्विटरनेही निवडणुकांच्या तोंडावर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने स्पॅम पाठवणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी ट्विटरवर फॉलो करण्याची मर्यादा कमी केली आहे. आता एका अकाउंटवरुन दिवसाला फक्त 400 नवे ट्विटर हँडल फॉलो करता येतील. सॅन फ्रान्सिस्कोच्या या कंपनीकडून जारी करण्यात आलं की, यानंतर आता कुठलाही यूझर एका दिवसाला 400 हून अधिक ट्विटर हँडल फॉलो करु शकणार नाही. पहिले ही मर्यादा 1000 होती.
ट्विटरच्या सुरक्षा टीमने याबाबत ट्वीट केले, “फॉलो, अनफॉलो, फॉलो, अनफॉलो, असं कोण करत? स्पॅमर्स”. म्हणून ट्विटरने एका दिवसाला फॉलो करण्याची मर्यादा 1000 हँडलहून 400 हँडलपर्यंत कमी केली आहे. तुम्ही चिंता करु नका. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, असेही ट्विटरने स्पष्ट केलं.
निवडणुकांदरम्यान जाहिरातींवर ट्विटरची नजर
लोकसभा निवडणुकांमध्ये ट्विटरने भारतासाठी जाहिरात पारदर्शकता केंद्र स्थापन केलं आहे. याअंतर्गत लोक राजकीय पक्षांच्या जाहिरातींचा तपशील तपासू शकतील. इथे जाहिराती देणाऱ्यांना जाहिरातींवर किती खर्च झाला हेही नमुद करावं लागतं. कंपनीने राजकीय जाहिरातींसाठीचे नियम आणखी कठीण केले आहेत.
ट्विटरच्या या नव्या सेवेमुळे सामान्य जनतेला कुठला पक्ष जाहिरातींवर किती खर्च करत आहे, याची माहिती मिळणार आहे. तसेच, समाजातील कुठल्या वर्गाला केंद्र करुन ही जाहिरात बनवण्यात आली आहे, हे देखील कळेल.
यापूर्वी व्हॉट्सअॅपने निवडणुकांमध्ये व्हायरल होणारे राजकीय मेसेजेस खरे आहेत की, खोटे हे ओळखण्यासाठी ‘चेकपॉईंट टिपलाईन’ फीचर लाँच केलं होतं. याच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर निवडणुकांसंबंधी येणाऱ्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या हे तपासता येणार आहे. देशातील नागरिक त्यांना मिळणाऱ्या चुकीच्या माहितीला किंवा अफवांना व्हॉट्सअॅपच्या +91-9643-000-888 या नंबरवर चेकपॉईंट टिपलाईन पाठवू शकतात. त्यानंतर प्रोटो प्रमाणित केंद्रावर ही माहिती पोहोचवेल. तिथे ही माहिती खरी की, खोटी याबाबत तपास केला जाईल. त्यानंतर वापरकर्त्याला ही माहिती किती खरी आहे याबाबत सांगितलं जाईल.