मुंबई- ट्विटरचा ताबा एलोन मस्क यांच्याकडे आल्यानंतर बरेच बदल करण्यात आले आहेत.मस्क यांनी कंपनीचं उत्पन्न आणि खर्च कमी करण्यासाठी काही पावलं उचलली आहे. मधल्या काळात कर्मचारी कपातीचा मुद्दाही चांगलाच गाजला होता. त्यानंतर ट्विटर युजर्संना वेगवेगळ्या रंगाचे टिक देण्यासोबत सब्सक्रिपशन मॉडेलही लाँच केलं होतं. मात्र भारतीय युजर्सकडून पैसे घेण्याबाबत अजूनही साशंकता होती.मात्र आता ब्लू टिक असलेल्यांना पैसे मोजावे लागणार आहे.मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं गुरुवारी भारतीय युजर्संना ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठीचं पॅकेज जाहीर केलं आहे.भारतासह जगातील 15 देशांना ट्विटरवरील ब्लू टिकसाठी पैसे भरावे लागणार आहे. ब्लू टिक सब्सक्रिप्शन यूएस, कॅनडा, जापान, युके आणि सौदी अरबमध्ये लागू आहे.भारतीय ट्विटर युजर्संना ब्लू टिकसाठी महिना 900 रुपये भरावे लागणार आहेत.अँड्रॉईड आणि अॅपल हँडसेट युजर्ससाठी ही किंमत सारखीच असेल.दोघांना 900 रुपयेच मोजावे लागणार आहेत. तर वेब युजर्ससाठी याचा चार्ज कमी असणार आहे. महिन्याकाठी 650 भरावे लागतील. दुसरीकडे, वार्षिक पॅकेज घेतल्यास महिना 566.70 रुपये द्यावे लागतील.
ट्विटरनं श्रेणीनुसार अकाउंट्सना त्या त्या रंगाचं टिक मार्क दिलं आहे. सरकारी संस्थांना ग्रे टिक, कंपन्यांना गोल्ड टिक आणि सामान्य व्यक्तींना ब्लू टिक मिळणार आहे. या टिकवरूनच आता त्या त्या अकाउंट्सची ओळख होत आहे.
तीन रंगांचे पर्याय उपलब्ध होण्यापूर्वी ब्लू टिक हा एकमेव पर्याय होता. अधिकृत खात्यांची शहनिशा करून ट्विटरकडून ब्लू टिक मिळायचं. यामुळे बनावट खाती ओळखणं सोपं व्हायचं. यापूर्वी सेलिब्रिटी, नेते, पत्रकार यांना त्यांच्या छबीनुसार ब्लू टिक मिळत होतं. मात्र आता ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटरने 2022 मध्ये ब्लू टिक सब्सक्रिप्शन मॉडेल आणलं होतं. तेव्हा अँड्रॉईड युजर्ससाठी 8 डॉलर्स आणि आयफोन युजर्ससाठी 11 डॉलर इतकं मासिक भाडे सांगितलं होतं.
ट्विटरवर ब्लू टिक असलेल्या युजर्संना काही सुविधा देखील मिळणार आहेत. यात रिप्लाय, मेंशन आमि सर्च यांना प्राथमिकता दिली आहे. तसेच होम टाइमलाईनवर 50 टक्क्यांपेक्षा कमी जाहिराती, मोठे व्हिडीओ पोस्टसह ब्लू लॅबचं अॅक्सेस देखील मिळेल. या व्यतिरिक्त ट्वीट एडिटसह इतर सुविधाही मिळणार आहेत.