मुंबई : चीनची मोबाईल निर्माती कंपनी शाओमीच्या फोल्डेबल टॅबलेटचा एक व्हिडीओ लीक झाला आहे. व्हिडीओमध्ये दाखवलेला टॅबलेट शाओमीच्या बहुप्रतीक्षित फोल्डेबल टॅबलेटचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडीओची सत्यता अद्याप पटली नसली, तरी दाव्यानुसार, शाओमीच्या लवकर लॉन्च होणाऱ्या फोल्डेबल टॅबलेटची उजव्या बाजूची स्क्रीन आणि डाव्या बाजूची स्क्रीन सहजपणे फोल्ड होऊ शकते. दोन्ही बाजूने फोल्ड झाल्यावर हा टॅबलेट स्मार्टफोनसारखा दिसेल. व्हिडीओची सत्यता पटली नसली, तरी सोशल मीडियावर मात्र शाओमीच्या फोल्डेबल टॅबलेटचा व्हिडीओ म्हणूनच पसरवला जात आहे.
हा फोल्डेबल टॅबलेट अँड्रॉईड, ओएएसवर चालतो. लीक झालेल्या व्हिडीओमध्ये चिनी भाषा दिसत आहे आणि होम स्क्रीनवर बॅक जाण्यासाठी अँड्रॉईड गेस्चरचा वापर केला आहे. होम स्क्रीनवर बॅक जाण्यासाठी स्क्रीनच्या खालच्या बाजूने स्वाईप करावे लागते. ही व्हिडीओ टिप्स्टर इव्हान ब्लासने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट केले आहे.
Can’t speak to the authenticity of this video or device, but it’s allegedly made by Xiaomi, I’m told. Hot new phone, or gadget porn deepfake? pic.twitter.com/qwFogWiE2F
— Evan Blass (@evleaks) January 3, 2019
इव्हान ब्लासने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ते व्हिडीओबद्दल खात्री देऊ शकत नाही. व्हिडीओला एका अंधारात शूट केले आहे. यामुळे डिव्हाईसच्या स्क्रीनशिवाय दुसरं काही समजत नाही. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती डिव्हाईसवर सगळ्यात पहिले गुगल मॅप्स (Google maps) ओपन करते आणि नंतर स्क्रीनला उजव्या आणि डाव्या बाजूने फोल्ड करते.
दरम्यान, सॅमसंग आणि लिनोव्हा कंपन्या आपला फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच लॉन्च करणार आहेत. त्यात आता शाओमीचाही नंबर लागू शकतो. जर इव्हान ब्लासच्या दाव्यानुसार हा व्हिडीओ शाओमीच्या टॅबलेटचा असेल, तर लवकरच सॅमसंग आणि लिनोव्हाच्या यादीत शाओमीचा नंबर लागेल.