मुंबई, गेल्या काही वर्षांपासून देशातील टेलिकॉम कंपन्या अत्यंत वाईट दिवसांमधून जात आहे. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठा मोबाइल ग्राहक असलेली कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वोडाफोन-आयडिया (Vodafone Idea) कंपनीवर संकट अधिक गडद होत आहे. याचे कारण म्हणजे व्होडाफोन-आयडियावर टॉवर कंपन्यांचे (Tower Company) सुमारे 10 हजार कोटींचे कर्ज आहे. या एकूण 10 हजार कर्जापैकी 7 हजार कोटींचे कर्ज कंपनीला लवकरात लवकर परत करावे लागणार आहे. जर कंपनी हे करू शकली नाही तर त्याचे नेटवर्क ठप्प होऊ शकते.
DoT डेटानुसार, कंपनीचे एप्रिल 2022 अखेर 259.21 दशलक्ष (सुमारे 26 कोटी) ग्राहक होते. तथापि, या कालावधीत कंपनीच्या ग्राहक संख्येत 1.6 दशलक्षने घट झाली आहे. कंपनी पुढील महिन्यात 7 हजार रुपये भरू शकली नाही तर त्याचा थेट परिणाम या 26 कोटी ग्राहकांवर होणार आहे.
व्होडाफोन-आयडिया कंपनीवर टॉवर कनेक्टिव्हिटीची सेवा देणाऱ्या इंडस टॉवरची 7 हजार कोटींची थकबाकी आहे. कंपनीने व्होडाफोन-आयडियाला कडक शब्दात सांगितले आहे की, तुम्हाला लवकरात लवकर पैसे द्यावे लागतील. अन्यथा नोव्हेंबरपासून कंपनीला त्यांचे टॉवर वापरता येणार नाही.
असे झाल्यास व्होडाफोन-आयडियाच्या अडचणी वाढतील पण रिलायन्स जिओ आणि एअरटेल सारख्या बाजारातील मोठ्या खेळाडूंना याचा फायदा होईल, पण प्रश्न या 26 कोटी ग्राहकांचा आहे जे व्होडाफोन-आयडियाचे नेटवर्क वापरतात. मोबाईल वापरण्यासाठी त्यांना दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कवर शिफ्ट करावे लागेल.
व्होडाफोन-आयडियाची स्थिती आधीच फारशी चांगली नाही. परिस्थिती सुधारण्यासाठी व्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरणही करण्यात आले आहे, मात्र ही योजनादेखील फारशी चालली नाही, जरी ग्राहकसंख्या वाढवण्यास मदत झाली असली तरी कंपनीवरील कर्जाचा बोजा वाढतच गेला. व्यावसायिक क्रियाकलापांशी संबंधित देयके सुमारे 15,000 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहेत. कंपनी डेट आणि इक्विटीच्या माध्यमातून 20 हजार कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अद्याप त्यात तिला यश आलेले नाही.