मुंबई : होळीचा सण हा सर्वांच्या आवडीचा असतो. रंगांचा हा सण सर्वच उत्साहाने साजरा करतात. या सणाचं महत्त्व म्हणजे रंग. रंग आणि पाण्याशिवाय होळीची मजा नाही. पण होळीच्या नादात अनेकदा आपल्या मोबाईल फोनचे मोठे नुकसान होते. होळी खेळताना अनेकदा आपल्या मोबाईलमध्ये पाणी जातं. त्यामुळे आपला फोन बंद पडतो. तेव्हा मात्र आपल्या आनंदात विर्जण पडतं. पण, काळजी करु नका. मोबाईलमध्ये पाणी गेल्यानंतर कशाप्रकारे तुम्ही तुमच्या फोनला वाचवू शकता याबाबत आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.
1. तुमचा मोबाईल जर पाण्यात भिजला असेल किंवा त्यामध्ये पाणी गेलं असेल, तर लगेच त्याला स्वीच ऑफ करा. ओला झालेला मोबाईल वापरणे धोकादायक ठरु शकते. कारण पाण्याने तुमच्या मोबाईलच्या सर्किटला नुकसान होऊ शकतं आणि तुमचा मोबाईल नेहमीकरिता खराब होऊ शकतो.
2. मोबाईल ऑफ केल्यानंतर त्याला आधी स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर त्याला टिशू किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा, जेणेकरुन मोबाईलमध्ये गेलेलं पाणी सुकण्यात मदत होईल. त्यानंतर मोबाईलमधून सिम कार्ड आणि मेमोरी कार्ड काढून घ्या आणि मोबाईला झटका. त्यामुळे मोबाईलमध्ये असलेलं सर्व पाणी बाहेर येईल.
3. त्यानंतर मोबाईला तांदळाच्या डब्ब्यात ठेवा आणि झाकण घट्ट लावून घ्या. तांदळाचे दाणे मोबाईलमधील ओलावा शोषूण घेतील. माबोईलला 24-48 तासांपर्यंत तांदळाच्या डब्ब्यात ठेवा.
4. मोबाईला सुकवण्यासाठी तुम्ही त्याचं बॅक पॅनल उघडून त्याला उन्हातही ठेवू शकता. उन्हात मोबाईलमधील पाणी लवकर सुकेल. पण, मोबाईल जास्तवेळ आणि कडक उन्हात ठेवू नका. त्यामुळे मोबाईलमधीन प्लास्टिक कम्पोनेंट वितळू शकतात.
5. मोबाईल सुरु झाल्यावर लगेच मोबाईलमधील डेटाचं बॅकअप घेऊन घ्या. कारण पाणी गेल्याने मोबाईलचे काही पार्ट खराब होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईचा डेटा नेहमीसाठी गमावू शकता.
काय करु नये :
1.जर तुमचा मोबाईल ओला झाला असेल आणि तो वॉरंटीमध्ये असेल, तर त्याला सर्व्हिस सेंटरवर घेऊन जा. तसेच त्यांना तुमच्या मोबाईलमध्ये पाणी गेलं असल्याची माहितीही द्या. कारण, मोबाईल उघडताच त्यांना हे कळून जाईल की मोबाईलमध्ये पाणी गेलं आहे. जर असं झालं तर कंपनी तुम्हाला वॉरंटी देणार नाही.
2. मोबाईलमध्ये पाणी गेल्यावर कधीही त्याला हेअर ड्रायरने सुकवण्याचा प्रयत्न करु नका. कारण हेअर ड्रायरची हवा खूप गरम असते त्यामुळे तुमच्या मोबाईलचे इलेक्ट्रॉनिक कम्पोनेंट खराब होऊ शकतात. तसेच मोबाईल ओव्हनमध्येही ठेवू नका.
3. मोबाईल ओला झाल्यावर त्याला चार्ज करु नका. यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतो.
जर होळीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये पाणी गेलं असेल तर तुम्ही वरील टिप्सचा वापर करु शकता. तरीही होळी खेळताना शक्यतोवर मोबाईल सोबत ठेवू नका.