नवी दिल्ली | 3 ऑक्टोबर 2023 : इन्स्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप (WhatsApp) ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. व्हॉट्सअपच्या दणक्याने जगभरात एकच खळबळ उडाली आहे. कंपनीने धडाधड युझर्सची खाती गोठवली आहे. त्यामुळे त्यांची सकाळीच झोप उडाली आहे. जगभरातील अनेक लाख युझर्सची खाती बंद करण्यात आली आहे. खाती बंद (Account Banned) करण्याचा सपाटा सुरुच आहे. यामध्ये अनेक भारतीय युझर्सचा पण समावेश आहे. मध्यंतरी भारत सरकारने लगाम ओढल्यानंतर व्हॉट्सअपसह गुगल ताळ्यावर आले. त्यांना केंद्र सरकारने भारतीय माहिती प्रसारण नियमांची आठवण करुन दिली आणि त्यांचे पालन करण्याची तंबी दिली होती. तेव्हापासून आता व्हॉट्सअपने भारतात पण खाती बंद करण्याची मोहिम उघडली आहे. या मोहिमेत तुमचा तर क्रमांक नाही ना?
जगभरात मोठा आकडा
व्हॉट्सअपच्या दणक्याने अनेक युझर्सची झोप उडाली आहे. मेटाची कंपनी असलेल्या व्हॉट्सअपने जगभरातील कोट्यवधी खाती बंद केली आहे. भारतातील 74.2 लाख खाती बंद करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात तर 2 लाख खाती बंद करण्यात आली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियमानुसार (IT Rules of 2021) ही कारवाई करण्यात आली आहे. यामधील 35,06,905 खाती तर कोणत्याही अहवालापूर्वीच धडाधड बंद करण्यात आली आहे.
का केली कारवाई
या खात्याचा गैरवापर होत असल्याचे समोर आले होते. राष्ट्रीय, तंत्रज्ञान सुरक्षेसंदर्भात या खात्यातील संशयास्पद हालचाली दिसून आल्याने ही खाती कायमची बंद करण्यात आल्याचे व्हॉट्सअपने जाहीर केले. इंजिनिअर, डाटा सायनटिस्ट, विश्लेषक, संशोधक आणि तज्ज्ञांच्या चाळणीतून ही खाती गेली. त्यात गडबड आढळल्यानंतर ही खाती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काहींची खाती केली सुरु
दरम्यान काही खाती तक्रारी आणि पडताळ्यानंतर पुन्हा सुरु करण्यात आली. पण त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वापरकर्त्यांना दिलासा देण्यात आला. तर खात्याच्या संशयास्पद हालचालींवरुन काही खाती अहवालापूर्वी तर काही अहवालानंतर बंद करण्यात आली. काही खात्याचा वापर सौहार्द बिघडविण्यासाठी होत असल्याचे समोर आल्यानंतर व्हॉट्सअपने ही कारवाई केली.