मुंबई : व्हॉट्सअॅप हे जगभरातील सर्वात लोकप्रिय अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही सहजरितीने आपल्या मित्रमैत्रिणींसोबत संवाद साधू शकता.हे अॅप वापरणाऱ्यांची संख्याही गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढली आहे. व्हॉट्सअॅपची लोकप्रियता पाहता कंपनीही वेळोवेळी बदल करते. नवनवे फीचर्स आणून युजर्संना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. व्हॉट्सअॅपची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत बरेच बदल झाले आहेत.स्टेटस, व्हिडीओ कॉल, कॉल आणि बरेच फीचर्स काळानुरूप जोडले गेलेत. आता व्हॉट्सअॅप आणखी फीचर आणण्याच्या तयारीत आहे.हे फीचर पहिल्यांदा बेटा युजर्संना वापरता येणार आहे. चाचणीत योग्य रितीने काम केल्यास हे फीचर्स इतर व्हॉट्सअॅप युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नेमकं फीचर काय आहे? तर हे व्हॉईस ग्रुप कॉलिंगसाठीचं फीचर असणार आहे. आता तुम्ही बोलाल की व्हॉईस ग्रुप कॉलिंग हे फीचर आधीपासूनच आहे. मग त्यात नवीन काय? जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर सविस्तरपणे जाणून घेऊयात.
व्हॉट्सअॅप सध्याच्या स्थितीला 32 जणांना ग्रुप कॉल करण्याची परवानगी देते. पण हा ग्रुप कॉल तुम्ही तुमच्या वेळेनुसार शेड्युल करू शकत नाहीत. व्हॉट्सअॅप बेटा इन्फोच्या मते, कंपनीने यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. या नव्या फीचरमुळे तुम्ही तुमचा ग्रुप वेळेनुसार शेड्युल करू शकता. व्हॉट्सअॅप बेटा इन्फोच्या अहवालानुसार, “व्हॉट्सअॅप आता नव्या फीचरवर काम करत आहे.या फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा ग्रुप कॉल शेड्युल करू शकता. यामुळे ग्रुप कॉल किंवा मिटींगची वेळ पाळणं सोपं होणार आहे. तसेच संवाद करणंही सोपं होईल.”
व्हॉट्सअॅपचं हे फीचर अँड्रॉईड 2.23.4.4 या वर्जन तपासलं जात आहे.या संदर्भातील एक स्क्रिनशॉटही WABetaInfo नं शेअर केला आहे. या स्क्रिनशॉनमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्यात युजर्स मिटींगचा मसुदा, तारीख आणि वेळ निश्चित करु शकतो. याबाबतची कल्पना ग्रुपमधील सर्व मेंबर्सना आधीच असणार आहे. तसेच ग्रुप मेंबर्सना वारंवार रिमांईडर देण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच योग्य वेळी कॉल सुरु होईल आणि संवाद साधणं सोपं होईल.
व्हॉट्सअॅप हे 100 हून अधिक देशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मेसेंजिंग अॅप आहे. जगभरात व्हॉट्सअॅपचे 2.24 बिलियन अॅक्टिव्ह युजर्स आहेत. व्हॉट्सअॅपवर 2016 ते 2020 या कालावधीत 1 बिलियन युजर्स जॉईन झाले. 100 बिलियन मेसेज दिवसाला फॉरवर्ड आणि रिसिव्ह केले जातात. जगभराच्या आकडेवारीनुसार भारतात व्हॉट्सअॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. भारतात 487.5 मिलियन व्हॉट्सअॅप युजर्स आहेत.