नवी दिल्ली : कस्टमर केअर फ्रॉड … (customer care fraud) याच्याशी संबंधित काही कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. एखाद्या माणसाला कस्टमर केअरमधून फोन आला आणि त्याच्या खात्यातून लाखो रुपये (lakhs of rupees) उडाले, असा किस्साही तुम्ही कधीतरी ऐकला असेलच. तुमच्या आजूबाजूला असे लोक असू शकतात जे अशा प्रकारच्या स्कॅमला (scam) बळी पडतात. अशा वेळी कस्टमर केअरच्या नावाखाली ही फसवणूक कशी होते आणि ती कशी टाळता येईल, असा प्रश्न पडतो.
दिल्लीतील एका महिलेला नुकताच असा अनुभव आला. तिच्यासोबत अशीच फसवणूक झाली. स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकल्यामुळे ती इतकी घाबरली, की तिला तिच्या सुरक्षिततेची आणि प्रायव्हसीची काळजी वाटू लागली. हा सगळा घोटाळा एका लिंकपासून सुरू झाला, जी एका स्कॅमरने तिला पाठवली होती.
खरंतर या महिलेने रेल्वेचे तिकीट बुक केले होते, परंतु काही कारणांमुळे तिने ते रद्द केले. तिकीट रद्द केल्यानंतर तिच्या खात्यात रिफंडची रक्कम शून्य अशी दिसत होती. अशा परिस्थितीत तिने कस्टमर केअरशी बोलण्याचा निर्णय घेतला. यासाठी महिलेने गुगलवर तिकीट कॅन्सलेशन रिफंड (Ticket Cancellation Refund) सर्च केले. सर्च रिझल्ट वर तिला सर्वात वरती कस्टमर केअर नंबर सापडला, जो प्रत्यक्षात एका स्कॅमरचा होता.
या महिलेला हा नंबर IRCTC च्या वेबसाइटच्या वर दिसत होता. जेव्हा तिने या नंबरवर कॉल केला तेव्हाच हा फ्रॉड झाला आणि तिला लाखो रुपये गमवावे लागले.
कसा झाला फ्रॉड ?
महिलेने सांगितले की, कॉलर संभाषणात इतका कन्व्हिसिंग होता, की तिला एकदाही स्कॅमची शंका आली नाही. स्कॅमरने तिला एक लिंक पाठवली आणि त्यावर तिची तक्रार नोंदवण्यास सांगितले. यावेळी जेव्हा तिने लिंकबाबत शंका व्यक्त केली, तेव्हा कॉलर म्हणाला की तो OTP तर मागत नाही. असे करून त्या स्कॅमरने महिलेला गोंधळात टाकले आणि तिच्या फोनमध्ये संशयास्पद ॲप (प्लांट) केले. या ॲपच्या मदतीने त्याने महिलेच्या फोनवर पूर्ण ताबा मिळवला. पीडितेच्या सांगण्यानुसार, स्कॅमर तिचे फोटो आणि इतर तपशीलांमध्ये ॲक्सेस करू शकत होता.
त्यांना त्याच्या बोलण्यात गुंतवून ठेवण्यासाठी तो (स्कॅणर) ट्रेनशी संबंधित माहिती काही वेळात शेअर करायचा, जी प्रत्यक्षात महिलेच्या फोनमध्ये आधीच होती. यानंतर फसवणूक करणाऱ्याने महिलेच्या खात्यातून नेट बँकिंग लॉगिनद्वारे (Net Banking )व्यवहार केला. आधी त्याने Payee ला स्वतःशी जोडले आणि नंतर 3 लाखांचा व्यवहार केला. यानंतर फसवणूक करणाऱ्याने महिलेच्या नावे 2.96 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्जही घेतले. तोपर्यंत महिलेला आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती मिळाली आणि तिने याबाबत तक्रार करण्यास सुरुवात केली.
सर्वप्रथम त्या महिलेने बँकेत फोन करून त्यांचे खाते ब्लॉक केले, मात्र तोपर्यंत स्कॅमरने एकूण 5 लाख रुपयांचा व्यवहार केला होता. पहिले त्याने बचत खात्यातून 3 लाख रुपये काढून घेतल्यानंतर त्याने महिलेच्या क्रेडिट कार्डमधून 2 लाख रुपये ट्रान्सफर केले. सुदैवाने त्याला कर्जाची रक्कम हस्तांतरित करता आली नाही.
कोणत्या समस्यांचा करावा लागला सामना ?
सर्व काही ब्लॉक केल्यानंतर महिलेने 1930 वर कॉल केला. पोलिसांनी सांगितले की, तिचे लोकेशन सध्या हरियाणा आहे आणि ती दिल्ली एनसीआरची रहिवासी आहे, त्यामुळे तिला दिल्लीत तक्रार नोंदवावी लागेल. या स्कॅमच्या वेळी ती ट्रेनमध्ये असल्याने तिने दिल्लीला पोहोचताच कमला मार्केट सायबर सेलकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर तिला नोएडा येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करावी लागली. एवढेच नाही तर या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी ट्विटही केले आहे. पीडितेने सांगितले की, पोलिस तीन वेळा तिच्या घरी जबाब घेण्यासाठी आणि तपासाशी संबंधित चौकशीसाठी आले होते, परंतु तिला तिचे पैसे कधी मिळतील याबद्दल काही सांगता येत नाही.
हे पैसे तिच्या सॅलरी अकाऊंटमधले होते आणि तिचा हीच बचत होती. तिच्याकडे इतरही खाती आहेत, पण त्यात फक्त थोडीशीच रक्कम होती. सर्व पैसे गेल्यामुळे तिला दैनंदिन खर्च भागवण्यासाठीही त्रास होतो.
कसा होतो कस्टमर केअर स्कॅम ?
या प्रकारच्या घोटाळ्यात बळी पडलेले बहुतेक जण ऑनलाइन कस्टमर केअर नंबर शोधत असतात. स्कॅमर अनेक प्रकारे त्यांचा नंबर ऑनलाइन नोंदणीकृत ठेवतात. त्यासाठी बनावट वेबसाईटही तयार केल्या जातात. युझर त्यांच्या जाळ्यात येताच, स्कॅमर त्यांचा गेम सुरू करतात. यापूर्वी, स्कॅमर्स व्यवहारासाठी ओटीपी मागायचे, परंतु अलीकडच्या काळात त्यांनी घोटाळ्याची संपूर्ण पद्धतच बदलून टाकली आहे. प्रथम ते लिंक पाठवतात आणि नंतर युजरच्या फोनमध्ये ॲप इम्प्लांट करतात. याच्या मदतीने ते युजरचे सर्व तपशील मिळवतात. तसेच त्यांना तुमच्या फोनवर प्रवेश मिळतो. यानंतर त्यांना तुम्हाला OTP विचारण्याची गरज पडत नाही.
पैसे नसतानाही कसा होतो फ्रॉड ?
खरं तर, अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्या खात्यात पैसे नाहीत, त्यामुळे आपली फसवणूक झाली तर काय नुकसान होईल? हे समजून घ्यावे लागेल की तुमच्या खात्यात पैसे नसले तरी वापरकर्ते तुमच्या नावावर कर्ज घेऊन पैसे ट्रान्सफर करू शकतात. एवढेच नाही तर तुमच्या क्रेडिट कार्डवरून पैसे ट्रान्सफरही करता येतात. अशा परिस्थितीत खात्यात पैसे नसले तरी फसवणूक करणारे तुमची फसवणूक करू शकतात.
कसा करावा बचाव ?
इंटरनेटच्या या जगात, केवळ सावधगिरी आणि सतर्कता तुम्हाला वाचवू शकते. कोणतीही वेबसाइट शोधताना, लक्षात ठेवा की कोणीतरी त्या नावाने बनावट वेबसाइट देखील तयार करू शकते. घोटाळेबाज अशा वेबसाइट्स अस्सल म्हणून डिझाइन करतात, जेणेकरून लोक त्यांच्या जाळ्यात अडकतात. हे टाळण्यासाठी, नेहमी विश्वसनीय स्त्रोतावरून ग्राहक सेवा क्रमांक शोधा. त्याऐवजी अधिकृत वेबसाइटवरूनच ग्राहक सेवा क्रमांक घ्या. तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची गरज नाही. जर कोणी तुम्हाला असे करण्यास सांगितले तर सावध रहा.