मुंबई : डिजीटल विश्वात इमोजींना फार महत्त्व दिले जाते. दररोज व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्ट्राग्राम यासह विविध सोशल मीडियावर चॅटींग करताना आपण टाईप करण्याऐवजी इमोजीचा जास्तीत जास्त वापर करतो. त्यामुळे सोशल मीडियावर हल्ली हसण्यापासून रडण्यापर्यंत आणि प्रेमापासून रागापर्यंतचे सर्व इमोजी उपलब्ध आहेत. दरवर्षी 17 जुलैला ‘जागतिक इमोजी दिवस’ साजरा केला जातो. यानिमित्ताने भारतात सर्वाधिक कोणता इमोजी वापरला जातो हे जाहीर करण्यात येते.
बोबल एआई (Bobble AI) या टेक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात सर्वाधिक ब्लोइंग किस आणि आनंदाचे अश्रू येणारे हे दोन इमोजी वापरले जातात. तर टॉप 10 इमोजींमध्ये स्माइलिंग फेस विद हार्ट, किस मार्क, ओके हँड, लाऊडली क्राईंग फेस, बीमिंग फेस विद स्माइलिंग आइज, थम्स अप, फोल्डेड हँड्स आणि स्माइलिंग फेस विद सनग्लासेस यांचा समावेश आहे. त्याशिवाय सणासुदीच्या दिवसात भारतात इमोटिकॉन्सचाही वापर केला जातो.
“सध्या इमोजी आपल्या डिजिटल संस्कृतीचा एक भाग झाले आहेत. तसेच हळूहळू ते संवाद साधण्याचा हे नवीन माध्यम होत आहे असे बोबल एआईचे सहसंस्थापक अनित प्रसाद यांनी सांगितले.”
2014 पासून इमोजी डे साजरा
यंदा जागतिक इमोजी दिवसाचे 6 वे वर्ष आहे. जगभरात 17 जुलै 2014 पासून इमोजी दिवस साजरा करण्यात येतो. सध्या सर्वच सोशल मीडिया वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात इमोजीचा वापर केला जातो. विशेष म्हणजे हल्ली शब्दांची जागा ही इमोजींनी घेतली आहे. त्यामुळे अनेकजण टाईप करण्यापेक्षा भावना व्यक्त करण्यासाठी इमोजींचा वापर करतात.
‘या’ व्यक्तीने तयार केला पहिला इमोजी
जगभरात पहिल्यांदा इमोजीचा वापर अमेरिकेत करण्यात आला. मेरीको मध्ये जन्मलेल्या हार्वी रोस बॉल याने पहिल्यांदा इमोजी म्हणून हसणाऱ्या चेहऱ्याचा (स्माईली फेस) वापर केला. त्याचा हा इमोजी अल्पावधीतच प्रसिद्ध झाला. मात्र हार्वीने या इमोजीचे कोणतेही पेटंट केले नव्हते.
‘हे’ होते इमोजी तयार करण्याचे कारण
हार्वी 1963 मध्ये एक जाहिरात आणि जनसंपर्क एजन्सी चालवत होते. या दरम्यान स्टेट म्युच्युअल लाईफ इन्शुअरन्स कंपनी ऑफ अमेरिका ही कंपनी त्यांच्याकडे एक समस्या असल्याचे सांगितले. ही इन्शुअरन्स कंपनी एका वेगळ्या कंपनीत विलीन होणार असल्याचे या कंपनीतील कर्मचाऱ्यांना मान्य नव्हते. त्यामुळे या कंपनीतील कर्मचारी नाराज झाले होते. हार्वीने त्यांची ही समस्या दूर करण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करत हसणारा चेहरा (स्माईली फेस) तयार केला. त्यावेळी हार्वीला त्या इमोजीचे 45 डॉलर मिळाले. त्याने त्या इमोजीचे 5 कोटी स्माईल इमोजी छापले आणि विकले. त्यानंतर 1999 मध्ये याच स्माईली फेसचा वापर यूएसच्या पोस्टल तिकीट सर्विसवर छापले. दरम्यान त्यानंतर टी-शर्ट, भिंत, उशीचे कव्हर, गादी, चादर, बॅग यासारख्या प्रत्येक ठिकाणी इमोजीचा वापर सुरु झाला आणि आता ते आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनले आहेत.