नवी दिल्ली | 29 डिसेंबर 2023 : सर्वांचा लाडका गुगल बाबा लपून छपून युझर्सची माहिती चोरत होता. ही हेरगिरी गुगलला महागात पडली. वापरकर्त्यांची खासगी माहिती चोरल्याप्रकरणात गुगलला दणका बसला. याप्रकरणात कायदेशीर गुंत्यात न अडकण्यासाठी कंपनीने भरपाईची भूमिका घेतली आहे. गुगलची मूळ मालक अल्फाबेट त्यासाठी 5 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 41 हजार कोटी रुपये भरपाई मोजणार आहे. हेरगिरी केल्याप्रकरणात गुगलविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. गुगलने हा खटला निपटारा केल्याचा दावा केला आहे.कॅलिफोर्नियातील न्यायालयाने कंपनीला त्यासाठी 24 फेब्रुवारी 2024 पर्यंतचा कालावधी दिला आहे. जर गुगलने विहित कालावधीत भरपाई केली नाही तर दंड ठोठावण्यात येईल.
तीन वर्षांपूर्वीचा खटला
हा खटला 2020 मध्ये दाखल करण्यात आला होता. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, Google एनालिटिक्स, कुकीज आणि एप्सच्या माध्यमातून ग्राहकांची हेरगिरी करते. त्यांचा डाटा चोरते. गुगल युझर्सची आवड-निवड, त्याचे मित्र, त्याचा छंद, आवडते हॉटेल, जेवण, खरेदीची सवय आणि इतर खासगी गोष्टींची माहिती चोरते. गुगलने हा खटला निरस्त म्हणजे फेटाळण्याची विनंती कोर्टाला केली होती. पण कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळली. या खटल्यात 1 जून 2016 रोजीपासून अनेक गुगल वापरकर्त्यांना प्रतिवादी करण्यास मंजूरी मिळाली. प्रत्येक युझरने कमीत कमी 5 हजार डॉलर भरपाई देण्याची विनंती केली आहे.
पुश नोटिफिकेशनमधून हेरगिरी
गुगलवर अनेक युझर्संनी यापूर्वी सुद्धा हेरगिरी करण्याचा आरोप लावला. अमेरिकन सीनेटर रॉन विडेन (Ron Wyden) यांनी याचे खापर सरकारवर फोडले. त्यांनी सरकारचा गुगलला पाठिंबा असल्याचा आरोप केला होता. त्यांनी न्याय विभागाला एक पत्र लिहिले. त्यात गुगल पुश नोटिफिकेशनच्या माध्यमातून हेरगिरी करत असल्याचा आरोप लावण्यात आला होता. पुश नोटिफिकेशन हा एक पॉप अप मॅसेज आहे. होम स्क्रीनवर नवीन मॅसेज आल्यावर तो युझर्सला अलर्ट देतो. यामाध्यमातून वापरकर्त्याची हेरगिरी करता येते. पुश नोटिफिकेशन ऑन केल्यावर टेक कंपन्यांना मोबाईलमध्ये कोणते एप इन्स्टॉल आहे, याचा पत्ता लागतो. तुमचा आयडी, पासवर्ड, मित्र, तुमची मित्र यादी, गुगलवर तुम्ही एकांतात करत असलेला सर्च याची सर्व माहिती मिळते.