Youtube ने हटवले लाखो व्हिडिओ
लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने जगभरात मोठी कारवाई केली. युट्यूबने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन जगभरातील 90 लाखांहून अधिक व्हिडिओ हटवले आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम भारतात दिसून आला. भारतातील 22.5 लाखांहून अधिकचे व्हिडिओ युट्यूबवरुन हटविण्यात आले आहेत. गुगलने ही कारवाई केली आहे. कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन करणे या क्रिएटर्सला महागात पडले आहे. ही आकडेवारी ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीतील आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये व्हिडिओ रिमूव्ह करण्याची माहिती दिली आहे.
गुगल मुक्त अहवालानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यात एकूण 30 देशांमध्ये सर्वाधिक भारतातील व्हिडिओ हटविण्यात आले आहेत. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर हा देश आहे. येथील 12.4 लाख व्हिडिओला कात्री लागली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. येथील 7.8 लाख व्हिडिओ हटविण्यात आले आहेत. युट्यूब कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्याने हे व्हिडिओ हटविण्यात आले आहेत.
युट्यूब चॅनल्स आणि कमेंटवर पण कारवाई
- नुकसानदायक आणि धोकादायक व्हिडिओची संख्या सर्वाधिक आहे. एकूण डिलीट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये यांची संख्या 39.2 टक्के इतकी आहे. यानंतर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक व्हिडिओंचा क्रमांक लागतो. एकूण व्हिडिओत असे 32.4 टक्के व्हिडिओ हटविण्यात आले आहेत. तर 7.5 टक्के हिंसक, 5.5 टक्के प्रौढ कंटेट असणाऱ्या व्हिडिओला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
- लोकांची दिशाभूल करणे, प्रेक्षकांना फसविणारे, आमिषाला बळी पाडणारे असे जवळपास 2 कोटींहून अधिक युट्यूब चॅनल्स या प्लॅटफॉर्मवरुन बाद करण्यात आले आहेत. याशिवाय 1.1 अब्ज कमेंट डिलीट करण्यात आल्या आहेत. 99 टक्के कमेंट आपोआप डिलीट करण्यात आल्या आहेत.
YouTube गाईडलाईन्स काय
- स्पॅम कंटेंट : फेक कंटेंट आणि स्वतःची ओळख लपवून कंटेट तयार करणे
- संवेदनशील माहिती : लहान मुलांची सुरक्षा, अंबट शौकीनांसाठीचा कंटेट, मृत्यूस कारणीभूत ठरणारा कंटेट
- हिंसक आणि धोकादायक कंटेट : शोषण आणि सायबर बुलिंग, हेट स्पीच या पट्टीत मोडणारे
- दिशाभूल : सरकार वा मोठ्या ब्रँडचे नाव वापरुन खोटी माहिती प्रसारीत करणे, दिशाभूल करणे. निवडणूक आणि औषधींसंबंधीची चुकीची माहिती देणे
- आयुधांचा वापर : युट्यूबवरील कमेंट्स, कृत्रिम बुद्धीमता यांचा वापर करुन कम्युनिटी गाईडलाईन्स लागू करण्यात येतात. क्रिएटर्सची पूर्वीपीठिका, राजकीय विचार, त्याचा कल यांचा पण विचार करण्यात येतो.