मुंबई : भारतासह जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) चा जीवघेणा संसर्ग वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात (India) कोरोना रूग्णांची संख्या 89 लाखांच्या पुढे गेली आहे. तर जगभरात आतापर्यंत 5 कोटी 68 लाख 62 हजार 543 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या संसर्गावर लस (Corona Vaccine) शोधण्याचं कामही जोरात सुरू आहे. अनेक कंपन्या कोरोनावरील लशीच्या वेगवेगळ्या टप्प्यांबाबत माहिती देत आहेत. काही कंपन्यांनी लस शोधल्याचा दावा केला होता. परंतु तो दावा फोल ठरला. या लशीबाबत काही वेळा फेक न्यूजदेखील व्हायरल झाल्या आहेत. परंतु आता या फेक बातम्यांना आळा बसू शकतो. त्यासाठी युट्यूबने (YouTube) महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. (Youtube is adding information about Covid-19 vaccines to its fact check panels)
काही महिन्यांपूर्वी युट्यूबने व्हिडीओज आणि सर्च अबाऊट पर्यायासह COVID-19 बाबतची माहिती देणारं एक पॅनल जोडलं आहे. या पॅनलवर कोरोनाबाबतची माहिती दिली जात होती. परंतु आता जगभरातल्या लोकांचं या आजाराबाबतच्या माहितीसह त्यावरील लशीबाबतच्या माहितीकडेही लक्ष लागलं आहे. त्यातच कोरोनावरील लशीबाबत अनेकदा फेक न्यूज व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे युट्यूब आता या पॅनलद्वारे कोरोनावरील लशीबाबतची माहिती शेअर करणार आहे.
सीएनईटीच्या रिपोर्टनुसार आता पॅनलवरील दोन्ही लिंक्स युजर्सना यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनसारख्या संस्थांकडून मिळणारी माहिती देतील. युट्यूबने याबाबत म्हटले आहे की, पुढील काही दिवसांमध्ये जगभरातील सर्व युजर्सना ही माहिती पाहता येईल. सध्या हे पॅनल अमेरिकेतील युजर्ससाठी सुरु करण्यात आलं आहे. व्हिडीओजच्या खाली हे नवं पॅनल अॅड करण्यात आलं आहे.
फेक न्यूजऐवजी लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचावी यासाठी युट्यूबने हे पाऊल उचललं आहे, याचं सध्या कौतुक होत आहे. विशेष म्हणजे अनेक फेक न्यूज युट्यूबवरच पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांमध्ये युट्यूब चॅनेल्सची संख्या कित्येक पटींनी वाढली आहे. अनेक युट्यूबर्स जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवण्यासाठी फेक न्यूजची मदत घेत असतात. अनेकदा युट्यूब त्यांच्यावर कारवाई करतं. परंतु काही वेळा ही कारवाई होण्यापूर्वी फेक न्यूज मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या असतात. त्यामुळे आता किमान कोरोना लशीबाबतच्या फेक न्यूजना लगाम बसेल.
संबंधित बातम्या
Corona Vaccine | सीरम इन्स्टिट्यूट आणि ICMR ची मोठी घोषणा, लवकरच कोविशील्ड लसीची अंतिम चाचणी
Corona Vaccine : कोरोनाची लस 94.5 टक्के परिणामकारक, मॉडर्नाचा दावा
(Youtube is adding information about Covid-19 vaccines to its fact check panels)