वॉशिंग्टन : सोमवारी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया महामार्गावर (Pennsylvania Highway) बर्फाचे वादळ (Snow Squall) आले. या वादळामुळे महामार्गावर एकामागून एक 50 ते 60 वाहने आदळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात आत्तापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पेनसिल्व्हेनियाच्या शुयलकिल काउंटीमध्ये घडला. अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या भीषण अपघाताचा एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला असून त्यात एकामागून एक वाहने आदळताना दिसत आहेत. बर्फवृष्टीमुळे वाहनचालकांचे नियंत्रण कसे सुटत आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारची धडक बसल्यानंतर लोक गाड्यांमधून बाहेर पडत आहेत. वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झालेला पाहायला मिळत आहे. बर्फवृष्टीमुळे दिसतही नव्हते.
पेनसिल्व्हेनिया परिवहन विभागाने अपघाताविषयी सविस्तर माहिती पेनसिल्व्हेनिया राज्य पोलिसांकडे पाठवली. सोमवारी दुपारी ट्विटरवर लिहिले होते, की 50 ते 60 वाहने पाइलअपमध्ये गुंतलेली. यात मृत्यूच्या माहितीसह तत्काळ तपशील दिलेला नाही. या ढिगाऱ्याने महामार्गावरील अनेक मैल वाहतूक खोळंबली, ज्यामुळे आपत्कालीन कार्य करण्यातही अडचणी येत होत्या. त्यांना ढिगाऱ्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले, की वाहनांची रांग सुमारे एक मैलपर्यंत वाढली. अतिरिक्त बर्फवृष्टीच्या धोक्यामुळे बचावकार्यात आणखी गुंतागुंत वाढली. ज्यामुळे अधिकाऱ्यांना अनेक तास महामार्ग बंद करावा लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील दृश्यमानता जवळपास शून्य होती, त्यामुळेच हा अपघात इतका भीषण होता. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुयलकिल कंट्रीमध्ये या महिन्यातील हा दुसरा मोठा अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे.