नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : तुमच्या आवडत्या छंदासाठी तुम्ही तुमचा किती वेळ दिला तरी मन भरत नाही. एका वयस्क महिलेने हातमागावर कापड विणताना एका कपड्यावर संपूर्ण गीतेचे श्लोक विणून काढले आहेत. त्यांनी लहानपणी कापड विणण्याची कला शिकली होती. या कामासाठी त्यांना अडीच वर्षे लागली आहेत. विषेश या महिलेला इंग्रजी येत नसतानाही आसामी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत हे श्लोक कापडावर विणण्यात आले आहेत. या अचाट कामगिरीमुळे सर्वत्र या महिलेची वाहवा होत आहे.
आसामच्या जोरहाट येथे रहाणाऱ्या 62 वर्षीय महिला हेमप्रभा यांनी लहानपणी कापड विणण्याची कला शिकली. त्यांनी नंतर या कलेत प्राविण्य मिळवित अनेक गोष्टींना कपड्यांवर विणण्यास प्रारंभ केला. त्यांनी गीतेचे सातशे पानांचे श्लोक या कापडावर उतरविले आहेत. या कापडावर आसामी भाषेत आणि इंग्रजी भाषेत त्यांनी गीतेच श्लोक विणल्याने या कापडाची लांबी तब्बल अडीचशे फूट इतकी झाली आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
इंस्टाग्रामवर emirateslovesindia and otherground.with.sai या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत हेमप्रभा हातमागावर हा कपडा विणताना दिसत आहेत. त्यांना असं काही करायचे होते. जे जगात कोणीच केलेले नाही. या अनोख्या छंदातून त्यांनी दोन वर्षे मेहनत घेऊन हे आश्चर्यकारक काम केले आहे. आधी संस्कृत, नंतर आसामी आणि इंग्रजी अशा भाषेत त्यांनी हे कापड विणले आहे. विशेष म्हणजे त्यांना इंग्रजी भाषेचे कोणतेही ज्ञान नाही तरी त्यांनी कागदावरील अक्षरे कापडावर जशीच्या तशी उतरविली आहेत.
या व्हिडीओला आतापर्यंत 90 हजाराहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे. 25 हजाराहून अधिक लोकांनी आपल्या कमेंट्स नोंदविल्या आहे. कमेंट्समध्ये त्यांची अनेकांनी स्तूती केली आहे. त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात यावा असे एकाने म्हटले आहे. तर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदविण्याची मागणी एका युजरने केली आहे.