आंध्रप्रदेश | 1 सप्टेंबर 2023 : ‘दैव देते आणि कर्म नेते’ असा काहीसा प्रकार एका शेतकऱ्याबाबत घडला आहे. आंध्रप्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील जोन्नागिरी गावात एका शेतकऱ्याला शेतात काम करताना चक्क हिरा सापडला. त्याला या हिऱ्याच्या किंमतीचा अंदाज आला नाही. हा चमकता दगड खरंच हिरा आहे की नुसताच दगड आहे याची त्या गरीब शेतकऱ्याला काही कल्पना नव्हती. त्याने त्या हिऱ्याला एका व्यापाऱ्याला दोन लाख रुपयांना विकले. परंतू त्या हिऱ्याची किंमत त्याहून अधिक असल्याचे इतर व्यापाऱ्याकडून त्याला कळले तेव्हा त्याला पश्चाताप झाला. आता त्याच्या शेतात हिरे शोधणाऱ्यांची रांग लागली आहे.
आंध्रातील कुरनूल जिल्ह्यातील जोन्नागिरी गावात एका शेतकऱ्याला चमकता दगड सापडला. हा रत्न आहे की हिरा याची कल्पना येत या शेतकऱ्याने घाबरतच त्याला एका व्यापाऱ्याला दाखविले. त्याने त्याबदल्यात दोन लाख रुपये दिले. आपण लखपती झाल्याच्या आनंदात शेतकरी असताना इतर व्यापाऱ्याकडून त्याला कळले की त्या हिऱ्याची किंमत पंधरा लाखांहून अधिक आहे. आंध्रात हिरे सापडण्याच्या घटना घडत असून व्यापारी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अत्यंत कमी दराने हिरे खरेदी करून फसवणूक करीत आहेत. एका महिलेलाही शेतात हिरा सापडला होता.
यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत 30 हून अधिक हिरे सापडले आहेत. गेल्या आठवड्यात मड्डीकेरा मंडलात एक महिला शेतात मजुरी करत असताना 15 लाखांचा हिरा सापडला होता. आता आणखी एक हिरा सापडल्याने हिरे शोधण्यासाठी शेतात लोक फिरत आहेत. या लोकांमुळे शेतकरी कंटाळले आहेत. दुसरीकडे पावसाअभावी शेतात पिक न आल्याने ते चिंताग्रस्त असताना आता हिऱ्यांसाठी येणारी मंडळी शेत उद्ध्वस्त करीत असल्याने शेतीकरी वैतागले आहेत.