नवी दिल्ली : अंगावर खाकीवर्दी आणि चोर तसेच गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी दाखवावा लागणारा कठोरपणा अशा तुलनेने रुक्ष वातावरणात एका कर्तव्यकठोर महिला पोलीस अधिकाऱ्याने आपला गायनाचा छंद जोपासणे म्हणजे थोडं विरळच आहे. परंतू एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने नोकरी आणि गायकी अशी दोन्ही तारांवरील कसरत सांभाळत आपली गायनाची आवड जोपासली आहे. सोशल मिडीयावर ही महिला पोलीस कर्मचारी स्टार झाली आहे. अभिनेता सोनू सूद यांनी देखील तिची तारीफ केली आहे. कोण आहेत या महिला पोलीस कर्मचारी ते पाहूयात…
अंगावर खाकी वर्दी आणि हातात गिटार असं वेगळं व्यक्तीमत्व पोलीस म्हणून कर्तव्य म्हणून पार पाडताना सहसा दिसत नाही. परंतू सोनिया जोशी हे नाव सोशल मिडीयावर सारखं चर्चेत असतं. उत्तराखंड पोलिस सेवेत कार्यरत 29 वर्षीय सोनिया यांच्या मधूर आवाजाने समाजमाध्यमावर त्यांचे कोट्यवधी फॅन फॉलोईंग बनले आहे. उत्तराखंडातील चमोली जिल्ह्याच्या सोनिया यांच्या गायिकेची बॉलीवूड स्टार सोनू सूद यांनीही तारीफ केली आहे. त्यांनी गायलेले एक गाणं एक कोटीहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. सोनिया यांना फेसबुकवर दोन लाख लोक फॉलो करतात. त्यांनी आपल्या बायोमध्ये स्वतला पोलीस कर्मचारी, आर्टीस्ट, सिंगर, गीतकार आणि परफॉर्मर म्हटले आहे.
अवघ्या 22 व्या वर्षी त्यांनी पोलीस दलात प्रवेश मिळविला होता. त्यांना गाण्याची आवड सुरूवातीपासून होती. गाणं म्हणजे त्यांची पॅशन आहे. त्यांच्या गायिकेमुळे सोशल मिडीयावर त्या स्टार झाल्या आहेत. त्यांच्या हिंदी आणि गढवाली गाण्यांना खूपच पसंत केले जात आहे. कोरोनाकाळात त्यांनी गायलेल्या यह रात भी कट जाएगी हे गाणं खूपच गाजलं. अभिनेता सोनू सूद यांनी देखील त्यांच्या गायकीची खूपच प्रशंसा करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हा पाहा व्हिडीओ..
‘तेरी मिट्टी मिल जाऊं’ या प्रसिध्द गाण्याला त्यांनी त्यांच्या आवाजात गायलं तेव्हा फेसबुकवर त्याला 95 लाखाहून अधिक व्यूव्ज मिळाले. मदर्स डेला गायलेल्या ‘तु कितनी अच्छी है मां’, या गाण्याला 40 लाख वेळा पाहिले गेले. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ वर बनविलेल्या ‘पुकार’ या गाण्याची तारीफ तर खुद्द उत्तराखंड पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक अशोक कुमार यांनी केली. सोनिया या नेहमी सोशल मिडीयावर सक्रीय असतात आणि उत्तराखंडातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांचे फोटोही टाकत एकप्रकारे उत्तराखंडचे प्रमोशन करीत असतात.