रस्त्यावरचे अपघात रोखण्यासाठी भले कितीही नियम कठोर केले तरी नियम मोडणारे लोक काही सुधारत नाहीत. विशेषतः दुचाकीस्वारांकडून नियम भंग होण्याचे प्रमाण अधिक आहे. मग ते दुचाकीस्वार मुंबईतील असो किंवा दिल्लीतील. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील रस्त्यांवरही नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण तितकेच अधिक आहे. सरकारने दुचाकींसाठी दोन प्रवासी व त्या दोघांनाही हेल्मेट बंधनकारक केले आहे. मात्र हा नियम प्रत्यक्षात किती अंमलात आणला जातो. यापुढे प्रश्नचिन्ह जैसे थे आहे. सध्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ भन्नाट व्हायरल होऊ लागला आहे. त्याचे कारण तसेच हटके आहे. दुचाकीस्वाराने आपल्या दुचाकीवर एक-दोन नव्हे तर तब्बल सहा लोकांना बसवल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा बहादुर पोलिसांपुढेही नरमलेला नाही. विशेष म्हणजे त्याच्याकडे ना हेल्मेट होते, ना गाडीची कुठलीही कागदपत्रे. त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबियांना दुचाकीवर बसवून परिसराचा फेरफटका मारला.
पोलिसांनी त्याला कारवाईसाठी रोखले आणि चलन फाडले. याचवेळी त्या दुचाकीस्वाराचा पराक्रम पाहून पोलिसाच्या तोंडून ‘व्हेरी गुड’ हे शब्द बाहेर पडलेच. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये तितकाच लोकप्रिय झाला आहे.
ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर शेअर झालेला व्हिडिओ राजस्थानच्या धौलपूर परिसरातील आहे. एका दुचाकीवर तब्बल सात जणांना पाहून वाहतूक पोलीस चक्रावून गेले.
विशेष म्हणजे पोलिसांनी संबंधित दुचाकी जप्त करण्याआधी दुचाकी स्वराची भरभरून स्तुती केली. नाकाबंदीदरम्यान सर्वच वाहनांची कसून तपासणी केली जात होती. त्याच दरम्यान हा दुचाकीस्वार पोलिसांच्या तावडीत सापडला.
पोलिसांनी ज्यावेळी दुचाकीस्वराला प्रश्न केला हे काय चाललेय. त्यावेळी त्याने हसत हसतच ‘हे माझंच तर संपूर्ण कुटुंब आहे’ असे मिश्किल उत्तर दिले. त्याच्या या धाडसी उत्तराचे देखील लोक कौतुक करू लागले आहेत.
राजस्थानातील वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांत या मोहिमेत सर्वसाधारणपणे दुचाकीवर तिघे तिघे बसले असल्याचे आढळले. मात्र व्हायरल व्हिडिओतील दुचाकीस्वाराचा प्रताप पोलिसांना चांगलाच चक्रावून टाकणारा ठरला.
नवरा, बायको आणि तब्बल पाच मुले असे एकूण सात जण दुचाकी वर कसे काय बसू शकतात या प्रश्नाने पोलिसांना भंडावून सोडले आहे. लोक दुचाकीवर दोनपेक्षा अधिक लोकांना बसवून स्वतःच्या जीवाशी का खेळतात? असा सवाल पोलिसांनी उपस्थित केला आहे.
आम्ही तपासणी मोहीम आणखी तीव्र करून सर्वच निष्काळजी वाहन चालकांना ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे राजस्थान पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.